एक ना अनेक गोंधळांच्या धास्तीत यंदाची(ही) दहावीची परीक्षा सुरू झाली. पहिला दिवस सुरळीत पार पडला आणि विद्यार्थी व पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र असा नि:श्वास परीक्षा घेणाऱ्या पर्यवेक्षकांना मात्र घेता आलेला नाही. प्रवेशपत्रांचे गोंधळ निस्तरण्याबरोबरच पर्यवेक्षकांना आणखी एक ओझे वाहावे लागत आहे. ते म्हणजे वर्गातील परीक्षार्थीचे मोबाईल सांभाळणे!
परीक्षा काळात वर्गातच नव्हे तर परीक्षा केंद्राच्या आवारातही सेलफोन आणण्यास बंदी आहे. तरीही अनेक विद्यार्थी सर्रास आपले सेलफोन वर्गात घेऊन येतात. परीक्षा सुरू होण्याआधी पर्यवेक्षक हे फोन बंद करून जमा करून घेतात. पण, हे महागडे सेलफोन जमा करून ठेवणे, ते कुठे गहाळ होणार नाही म्हणून त्यांच्यावर पाळत ठेवणे आणि शेवटी परीक्षा संपल्यानंतर ज्याचे त्याला परत करणे ही पर्यवेक्षकांकरिता डोकेदुखी ठरू लागली आहे. केवळ पर्यवेक्षकच नव्हे तर विद्यार्थ्यांचेही लक्ष या फोनमुळे विचलित होत असल्याची पर्यवेक्षकांची तक्रार आहे. त्यामुळे, पालकांनी परीक्षेला जाणाऱ्या आपल्या पाल्याकडून फोन काढून घ्यावा, असे आवाहनवजा सूचना शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांच्या शंका दूर करणे, कॉपीसारखे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून सतर्क राहणे या बरोबरच हे सेलफोन सांभाळण्याचे काम शिक्षकांना करावे लागत असल्याने त्यांच्यासाठी ते नसती डोकेदुखी ठरते आहे. ‘आम्ही देखील ‘राज्य शिक्षण मंडळा’च्या सूचनेबरहुकूम आमचे सेलफोन बंद करून ठेवतो. आम्हालाही आमचे फोन वर्गात आणण्याची परवानगी नाही. त्यामुळे आम्ही ते स्टाफरूममध्येच ठेवतो. पण, विद्यार्थी वर्गात फोन घेऊन येत असल्याने ते जमा करून घेण्याची नसती उठाठेव आम्हाला करावी लागते,’ अशा शब्दांत हरीश पंडय़ा या शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही मुलांवर लक्ष ठेवायचे की त्यांच्या फोनवर अशी पृच्छा त्यांनी केली. सोमवारी दहावीच्या परीक्षेच्या वेळेस पंडय़ा यांना १४ विद्यार्थ्यांचे सेलफोन जमा करून घ्यावे लागले होते. ‘खरेतर परीक्षेच्या काळात आपल्या विद्यार्थ्यांना सेलफोन देऊ नये ही काळजी पालकांनीच घ्यायला हवी. पण, पालक महागडे सेलफोन पाल्यांकडे देतात. ते विद्यार्थी आपल्या बॅगेत ठेऊ शकत नाहीत. कारण, या बॅगा बाहेर असतात. म्हणून त्यांचा आग्रह असतो की सेलफोन वर्गातच त्यांच्या समोरील टेबलावर ठेवले जावे. इतके करूनही अनेक विद्यार्थ्यांचे पेपर लिहिण्याबरोबरच टेबलावरील सेलफोनवरही लक्ष असते. यामुळे, त्यांची एकाग्रता ढळू शकते. म्हणून आपले मूल परीक्षेला जाण्यापूर्वी पालकांनीच त्यांच्याकडील फोन आपल्या ताब्यात घ्यावा,’ अशी सूचना मालाडच्या डीएव्ही शाळेचे शिक्षक अविनाश सावंत यांनी केली. या संबंधात मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तर स्पष्ट शब्दांत मंडळांच्या नियमांची आठवण करून दिली. ‘परीक्षेच्या काळात सेलफोन केंद्राच्या आवारात आणण्यास मनाई आहे. अनेकदा मुले फोन बंद करून ठेवल्याचा युक्तिवाद करतात. हा चुकीचा असून शाळेनेच विद्यार्थ्यांना सेलफोन आणून देण्यापासून मज्जाव करावा,’ अशी पुस्ती त्यांनी जोडली.

Story img Loader