या सगळ्या परिस्थितीतही निवडणुकांचे राजकारण दुष्काळापेक्षा मोठा चटका देतील असेच दिसते.
थोरात-विखे गटात विभागलेली काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांना गेलेले तडे, भाजपच्या पाचवीला पुजलेली सुंदोपसुंदी आणि नेतृत्वहीन शिवसेना अशीच जिल्ह्य़ात सध्या ढोबळ राजकीय स्थिती आहे. भपक्याच्या परिणामकारकतेत राष्ट्रवादी अग्रेसर आहे, विभागलेली असली तरी काँग्रेसची भिस्त थोरात-विखेंवरच आहे आणि भाजप-शिवसेनेचे भवितव्य पुन्हा नकारात्मक मानसिकतेवरच आहे. नगरच्या लोकसभेसाठी
एकिकडे राष्ट्रवादीत सध्याच मोठा संघर्ष सुरू आहे, दुसरीकडे काँग्रेसमध्ये विखेंची चाचपणी आणि त्यासाठी राजकीय पेरणी सुरूच आहे. भाजपमध्ये खासदार दिलीप गांधींचा एकहाती कार्यक्रम सुरू आहे, विरोधी गट उमेदवारी बदलासाठी पुन्हा देव पाण्यात बुडवून बसला आहे, मात्र त्यांना सध्या तरी गांधींना पर्याय सापडलेला नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघाकडे प्रस्थापित राजकारण्यांचे तुलनेने दुर्लक्षच आहे. ‘आपला माणूस’ म्हणून त्याचा फायदा उठवत शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मतदारसंघावरील पकड आणखी घट्ट केली खरी, मात्र येत्या निवडणुकीत ते कोणाचे उमेदवार; याचे कुतूहल आहेच.
नगरची लोकसभा आता दुरंगीच झाली पाहिजे, तिरंगी होऊ द्यायची नाही असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असला तरी त्यांच्यातच उमेदवारांची रांग लागली आहे. माजी आमदार राजीव राजळे, पालकमंत्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमसिंह, पक्षाचे जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार अशी नावे चर्चेत आहेत. त्यातही राजळे-पाचपुते यांच्यातील चुरस अधीक तीव्र आहे. राजळे यांची भिस्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर, तर पाचपुते यांची भिस्त दस्तुरखुद्द शरद पवार यांच्यावरच आहे. जुन्या-जाणत्यांना मात्र पुन्हा ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या उमेदवारीची अपेक्षा आहे. त्यांचा विधानसभा मतदारसंघ आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेला असला तरी नगरच्या जागेवर त्यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे भाजपतही राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांची लोकसभेच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे.
विधानसभेच्या दृष्टीने विचार केला तर जिल्ह्य़ातील बारापैकी काहीच जागांवरील उमेदवार व त्यांच्या पक्षाबाबत उत्सुकता आहे. बहुसंख्य जागांवर फारसा फरक न होता आहेत तीच मंडळी दिसतील. अकोल्यात राष्ट्रवादीकडून बहुदा वैभव मधुकर पिचड हेच रिंगणात उतरतील. कोपरगावमध्ये बिपीन कोल्हे की स्नेहलता बिपीन कोल्हे याबाबत कुतूहल आहे. कर्जत-जामखेडमध्ये दोन्ही काँग्रेसमध्ये पुन्हा इच्छुकांची मांदियाळी गोळा होईल असे दिसते. तसे झाले तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राम शिंदे यांच्या अडचणी कमी होतील. लोकसभेला वर्णी लागली तर पाथर्डीत राजळे नसतील, मात्र आता भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे काय करतात याकडे तालुक्याचे लक्ष आहे. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीकडून पुन्हा पालकमंत्री पाचपुते यांच्यासह त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह व शेलार यांचीही नावे चर्चेत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे व कुंडलीकराव जगताप काय करतात याचीही उत्सुकता आहे. पारनेरमध्ये शिवसेनेचे आमदार पुन्हा धनुष्यबाणच उचलणार की ‘मनगटावर घडय़ाळ चढवणार’ याविषयी आत्तापासूनच कुजबूज सुरू आहे. आघाडीत नगर शहर काँग्रेसकडेच राहणार की, पुन्हा राष्ट्रवादीत यासाठी खल होणार, मनसेकडेही लोकांचे लक्ष असून भाजपमधून कोणी त्यांच्या गळाला लागतो की काय, याची उत्सुकता आहे.
या सगळ्या राजकीय धामधुमीत विकासकामांकडे राजकीय कर्ती मंडळी किती गांभीर्याने पाहते हा प्रश्नच आहे. नगरच्या औद्योगिक विस्तारीकरणाचे गाजर आणखी किती दिवस दाखवले जाणार, यावर शहराच्या अधोगतीचा वेग कमी-जास्त होईल. मुळात जागेच्या अडचणी आणि इच्छाशक्तीचा अभाव यामुळे केवळ घोषणाबाजीवरच नगरकरांची भलामण सुरू आहे. शिवाय नगर शहरातील उड्डाणपूल, बाह्य़वळण रस्ता, भुईकोट किल्ल्याचे थांबलेले सुशोभिकरण या राज्य सरकारच्या स्तरावरील योजना, तसेच महानगरपालिकेच्या गलथान कारभारात रेंगाळलेली नगरोत्थान योजना, शहराची सुधारित व केडगावची महत्वाकांक्षी पाणी योजना, नेहरू मंडईच्या जागेवरील व्यापारी संकुल अशा एक ना अनेक गोष्टींना या वर्षांत तरी मुहूर्त लागेल अशी अपेक्षा करूया. शिर्डीच्या विनानतळावरून यावर्षी तरी विमाने झेपावतील, निळवंडेचे कालवे मार्गी लागतील अशी आशा लोकांना आहे.     

Story img Loader