रेल्वे मंत्र्यांनी नुकत्याच सादर केलेल्या रेल्वे बजेटमध्ये बुलेट ट्रेनचे स्वप्न रेल्वेप्रवाशांना दाखविले. विमानतळाऐवढी स्वच्छता रेल्वेस्थानकांमध्ये ठेवली जाणार असल्याचे सूतोवाचसुद्ध त्यांनी केले. मात्र हे दिव्य स्वप्न दाखविणाऱ्या रेल्वे मंत्री देशातील अनेक रेल्वे स्थानकांच्या भयावह वास्तवापासून अनभिज्ञ असावेत. पनवेल तालुक्यात हार्बर मार्गावरील नावडे रेल्वेस्थानक त्याचे वास्तवादी उदाहरण आहे. होऊ घातलेल्या आतंरराष्ट्रीय विमानतळामुळे येथील पायाभूत सुविधांकडे सरकार लक्ष पुरवत असताना नावडे रेल्वेस्थानकामध्ये प्रवाशांना जाण्यासाठी वाटच नसल्याचे कटुसत्य या ठिकाणी पाहायला मिळते.
दिवा-पनवेल लोहमार्गावरील नावडे रेल्वेस्थानकामध्ये जाण्यासाठी वाट नसल्याने येथे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वेस्थानकातून रस्त्यावर येण्यासाठी जीव मुठीत घेऊन रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. हे करत असताना चिखलातून आपली वाट शोधत रस्त्यापर्यंत यावे लागते. नावडे वसाहतीमधून नावडे स्थानकात जाण्यासाठी मोठी झाडी आणि तळ्याचा वेढा स्थानकाच्या प्रवेशद्वाराला बसला आहे. वसई, विरार, ठाणे, मुंबई या परिसरांत बहुतांश कामगार तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला आहेत. त्यांना ठाणे दिवामार्गे येणाऱ्या लोहमार्गामुळे नावडे हे रेल्वस्थानक सोयीचे आहे. परंतु येथील पायभूत सोयींच्या अभावामुळे येथील प्रवाशांचे हाल सुरू आहेत. या परिस्थितीवरून रेल्वे प्रशासनाला या स्थानकाचे काही सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट होते. रेल्वेस्थानकाला खेटून असलेल्या झोपडपट्टीमुळे येथून एकटेदुकटे जाण्याचे सामान्य प्रवासी टाळतात. भंगारवाल्यांचा येथे दबदबा दिसतो. ज्या स्थानकात जायलाच वाट नाही तिथे विजेची सोय आणि पिण्यासाठी पाण्याची बोंबाबोब असणे क्रमप्राप्त आहे. तिकीटघरातील कर्मचाऱ्यांच्या डोक्यावरचे छप्परही गळणारे आहे.
येथील ओल्या, पापुद्रे पडलेले आणि कोसळलेल्या भिंती हे स्थानक अनेक वर्षांचे ओसाड असल्याच्या खुणा दर्शवते. त्यामुळे येथे रेल्वे कर्मचारीही बसायला घाबरतात. स्थानकातील शेडमधील पत्रे सडल्याने पावसाचे पाणी अंगावर झेलत रेल्वेची वाट पाहण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी या स्थानकातून एक चांगला न गळणारा पत्रा शोधून दाखवावा असे आव्हान प्रवासी देत आहेत. गळक्या पत्रातून रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या जलधारामुळे येथे प्रवाशांना बसण्यासाठी एक बाकडे कोरडे सापडत नाही. येथील बाकाप्रमाणे येथील प्लॅटफॉर्मही संपूर्ण ओला. सुविधांचा अभाव आणि सुरक्षेचे वाजलेले बारा हे ह्य़ा स्थानकाचे सत्य. येथे कोणतेही सुरक्षारक्षक नसल्याने हे स्थानक प्रवाशांनीच असुरक्षित घोषित केले आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांना या परिसरात जायचे आहे असे प्रवासी रात्री थेट पनवेल स्थानकात उतरून येथे येणे पसंत करतात.
सिडकोने नावडे नोडची निर्मिती केली. या नोडमधील घरांची विक्री नावडे स्थानकाला लागून असल्याने भरभर झाली. परंतु या नोडमधून रेल्वेस्थानकापर्यंत जाण्यासाठी मार्गच शिल्लक नाही. प्रवाशांना नावडे ते तळोजा औद्योगिक वसाहतीमधील पुलाखालून झोपडपट्टीतील पायवाटेतून चिखल तुडवत येथील मार्गक्रमण करावे लागते. रूळ ओलांडताना येणाऱ्या रेल्वेचा धाक मनात बाळगून प्रवासी येथील रुळावरून स्थानकापर्यंत पोहोचतात. औद्योगिक वसाहतीमधील कामगार प्रवाशांसाठी उड्डाणपुलावरुन खाली येण्यासाठी जिन्याचा मार्ग आहे. परंतु जिना उतरल्यानंतर त्यांनाही याच रुळावरून जाऊन स्थानक गाठावे लागते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा