लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या वा विविध कारणांमुळे काही वर्षे निलंबित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना विद्यमान पोलीस आयुक्त राकेश मारीया यांच्या एका आदेशामुळे पुन्हा सेवेत येण्याची निर्माण झालेली आशा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अनास्थेमुळे धुळीस मिळाली आहे.
यापैकी काही अधिकारी एप्रिलअखेरीसच निवृत्त होत आहेत तर काही अधिकाऱ्यांची फक्त वर्षभराची सेवा शिल्लक आहे. न्यायालयीन वा विभागीय चौकशी अहवालाच्या अधीन राहून आम्हाला सेवेत घेण्यास आयुक्त तयार असतानाही केवळ गृहराज्यमंत्रालयाचा अहवाल न मिळाल्याने त्यात अडचणी आल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विविध कारणांमुळे निलंबित असलेल्या ३५ पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी सेवेत घेतल्यानंतर अशा अनेक अधिकाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. तब्बल दोनशे पोलीस सध्या निलंबित आहेत. मात्र काहीही काम न करता त्यांना ७५ टक्के वेतन मिळत आहे. अशावेळी या अधिकाऱ्यांची सेवा वापरावी, या हेतूने मारीया यांनी या सर्व प्रकरणांचा आढावा घेऊन ३५ जणांना सेवेत घेतले.
उर्वरित प्रकरणांचाही आढावा घेतला जात आहे. मात्र निलंबित असलेल्या आणखी काही अधिकाऱ्यांबाबत गृहराज्यमंत्र्यांकडून अहवाल न आल्याच्या कारणास्तव त्यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत निर्णय घेता येत नाही, असे सूत्रांनी सांगितले.
गेले काही महिने गृहराज्यमंत्र्यांकडून काहीच हालचाल झालेली नाही, असेही या सूत्रांनी सांगितले. आता काही अधिकारी सेवानिवृत्त होतील. त्यापैकी काहींच्या बढत्याही त्यामुळे रोखल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Story img Loader