तामिळनाडूत कलपक्कम येथे ५०० मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टीसाठी सांगली जिल्ह्यातील किर्लोस्कर ब्रदर्सनी सोडियम पंपाची निर्मिती केली आहे. या शीतकृत अणुभट्टीसाठी सोडियम पंप निर्मिती करणारी किर्लोस्कर ब्रदर्स ही पहिली देशी कंपनी ठरली आहे.
भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड (भाविनि) या केंद्र  सरकारच्या अणु ऊर्जा विभागाच्या नियंत्रणात असलेल्या कंपनीतर्फे चेन्नईपासून ७० कि.मी. अंतरावर विद्युत निर्मिती करणारी अणुभट्टी उभारण्यात येत आहे. या कंपनीसाठी लागणारे सोडियम पंप किर्लोस्करवाडी येथील कारखान्यात तयार करण्यात आले आहेत. हे पंप भाविनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष डॉ. प्रभातकुमार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. किर्लोस्करवाडीहून हे पंप खास वाहनाने चेन्नईकडे रवाना करण्यात आले. या वेळी किर्लोस्कर ब्रदर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर  उपस्थित होते.
या वेळी श्री. किर्लोस्कर म्हणाले की, फास्ट ब्रिडर अणुभट्टीसाठी संवेदनशील वापराचे सोडियम पंप बनविणारी किर्लोस्कर ही देशातील पहिली व एकमेव कंपनी ठरली आहे. भारताच्या अणु ऊर्जा क्षेत्रात अग्रेसर राहण्याचा कंपनीचा प्रयत्न राहिल.
या वेळी बोलताना भाविनीचे अध्यक्ष प्रभातकुमार म्हणाले की, देशी बनावटीच्या या पंपामुळे प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर रिएॅक्ट सत्यामध्ये उतरण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. अणु ऊर्जेत अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्यात भारत हा चौथ्या क्रमांकावर असून या पद्धतीने पंप निर्मितीची क्षमता किर्लोस्करने दर्शविली हे भविष्याच्या दृष्टीने चांगले ठरले आहे. या वेळी किर्लोस्कर ब्रदर्सचे ऊर्जा विभागाचे अध्यक्ष रिवद्र उलंगवार, संचालक जी. आर. सप्रे, तांत्रिक संचालक टी. के. मित्रा आदींसह कंपनीचे अधिकारी,कर्मचारी, अभियंते उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा