आभाळात काळे ढग जमू लागले की प्राणी, पक्षी आनंदीत होतात. आनंद व्यक्त करतात. कलावंतांचेही थोडफार असेच आहे. कोरा कागद, कॅन्व्हास आणि रंग हातात आले की कलावंतांच्या अभिव्यक्तीला बहर येतो. माध्यम, आकार आणि पृष्ठभागाचे (सरफेस) बंधन सोडून मनातले व मनाच्या कक्षेबाहेरचे व्यक्त होते आणि कलाकृतीत येते. अशा कलाकृतींचा सहअनुभव अक्षय या चित्र प्रदर्शनातून प्रा. सुभाष बाभुळकर यांनी प्रदर्शित केला आहे.
मुंडले एज्युकेशन ट्रस्टद्वारा संचालित सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्ट्स (सिस्फा) तर्फे लक्ष्मीनगरातील सिस्फाच्या गॅलरीत चित्रकार सुभाष बाभुळकर यांच्या अक्षय या चित्र प्रदर्शनाचे बुधवारी बैद्यनाथचे प्रमुख संचालक सुरेश शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नागपूर शासकीय चित्रकला महाविद्यालयात अध्यापन करणारे बाभुळकर निसर्गघटकात ग्रामीण जीवनातून आलेले भाव चित्राच्या माध्यमातून व्यक्त करतात. मोर, सायकलस्वार, मासे विकणारे, वृक्षावर विसवणारे, नायक, वेली, झाडे इत्यादी आकार बाभुळकर यांच्या चित्रात दिसून येतात. मुंबईत जे.जे. सारख्या कलासंस्थेतील अमूर्त चित्रणाचे संस्कार व ग्रामीण संवेदना, साधी मांडणी सहज लयदार रेषेतून काव्यात्मक पद्धतीने केलेली ही चित्रे आहेत. काव्यात्मक कृती आणि चित्रकाराचे मन, माध्यमाने स्वीकारून लय, अलंकरण, विरोधी रंग, लोकसंस्कृती, वेशभूषा बाभुळकर यांच्या चित्रात आहे. तशीच ती चित्रकलेमध्ये आहे. भारतीय चित्रकलेतील लयदार रेषा, काळ्या पांढऱ्या तर क्वचित धुसर रंगाच्या सहाय्याने चित्रित करताना व्यक्त होते असे मानणारे प्रा. बाभुळकर बसच्या तिकिटामागचा पांढरा कागद सुद्धा रेषांनी व्यापून घेतात. आकारापेक्षाही त्यावेळी त्यांची ती उत्स्फूर्तपणे नोंद होते. अशा नोंदीवजा रेखाटनाची वही झपाटल्यासारखी कलावंतांनी करायची असते. आजच्या तरुण पिढीच्या भाषेत ‘फेसबुक’ वर रोज तीन चार ड्राईग्ज अपलोड करणारे बाभुळकर थकत नाहीत. फ्रेंडलिस्ट थकते. रोज होणारे हे प्रदर्शन या कलावंताने साकारले आहे. जे.जे.आर्ट कॉलेजमधून पुसद येथे आल्यावर शाईचा पेन आणि कागद असा मर्यादित चित्रपृष्ठ आपलासा केला. परिस्थिती व वातावरण यांच्या सुयोग्य वापरातून नागकन्या, वृषभ प्रतीक्षा सृजन प्रेरणा देणारा मोर त्यांनी चित्रकलेमध्ये वापरला. ओळख होइपर्यंत चित्रकार म्हणून सुरुवातीचा काही वर्षे अमूर्त चित्रकला स्वीकारणारे बाभुळकर आज अवतीभोवती दिसणारे आकार, मानवाकार, रेषा व रंगामधून चित्रित करतात. कमळ, कासवल, मासे, वेली, प्राणी, पक्षी अवरतात. चित्रातल्या रेषा वगळल्यास रंगलेपनातून अमूर्त चित्रसंस्काराची आठवण येते. रंगाशी होणारा कलावंताचा हा सहज्
ासंवाद असतो आणि तो आहे. मुंबई, हैदराबाद, चेन्नई, औरंगाबाद, चंदीगड येथील विविध प्रदर्शनातून यापूर्वी त्यांनी चित्रे प्रदर्शित झाली आहेत. सुभाष बाभुळकरांच्या चित्रावर चित्रकार चंद्रकात चन्ने आणि विकास जोशी यांनी चित्रात्मक मंते मांडली. सोप्या विषयावरील भावनिक मांडणीसह चित्रनिर्मितीवरही कशी मात करते त्यासाठी एका हळव्या चित्रमनाची आवश्यकता कशी महत्त्वाची ठरते, असे प्रतिपादन चन्ने यांनी केले. ७ जुलैपर्यंतच सिस्फाच्या छोटय़ा गॅलरीत प्रदर्शन सुरू राहणार असून चित्ररसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बाभुळकरांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन
आभाळात काळे ढग जमू लागले की प्राणी, पक्षी आनंदीत होतात. आनंद व्यक्त करतात. कलावंतांचेही थोडफार असेच आहे. कोरा कागद, कॅन्व्हास आणि रंग हातात आले की कलावंतांच्या अभिव्यक्तीला बहर येतो.
First published on: 04-07-2014 at 12:56 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prof subhash babhulkars painting exhibition