पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत देवलापारच्या जंगलात सापडलेल्या वाघाच्या मृतदेहाचा पंचनामा करताना त्याची विजेचा शॉक देऊन अत्यंत व्यावसायिक पद्धतीने शिकार केल्याचे उघडकीस आले आहे. या वाघाचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. त्याचे मुंडके, चारही पंजे आणि नखे कापून नेण्यात आले आहे तसेच त्याची कातडी संपूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे व्यावसायिक शिकारी टोळ्यांचा मोर्चा आता पेंच व्याघ्र प्रकल्पाकडे वळल्याचे स्पष्ट झाले आहे. वाघाच्या शिकाऱ्यांचा माग घेण्यासाठी पहिल्यांदाच श्वानपथकाची मदत वन विभागाने घेतली असली तरी फार दूपर्यंत श्वानांनी मार्ग दाखविलेला नाही.
जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर पवनीकडून देवलापारकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या मंदिरापासून अंदाजे ४०० मीटर अंतरावरील बीट क्रमांक ५८२ मध्ये गस्तीवर गेलेल्या बीट गार्डला हा वाघ गुरुवारी, १७ जानेवारीला मृतावस्थेत आढळून आला होता. त्याला ज्या क्रूर पद्धतीने विजेचा शॉक देऊन ठार करण्यात आले त्या पद्धतीने वन विभाग हादरला आहे. घटनास्थळी शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्यही सापडले असून यात तारांची गुंडाळी, लोखंडी सापळे यांचा समावेश आहे. शिकाऱ्यांनी मागे सोडलेल्या पुराव्यांचा माग घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदाच श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांच्या पद्धतीने तपासकाम सुरू आहे. स्थानिक शिकाऱ्यांच्या सहभागाने बाहेरील व्यावसायिक शिकारी टोळीने ही शिकार केल्याचा अंदाज असून लवकरच काहींना अटक करण्यात येईल, असा दावा नागपूरचे मानद वनसंरक्षक कुंदन हाते यांनी केला.
वाघाच्या मृतदेहाचे तीन पशुवैद्यकांनी एनटीसीएचे सहायक महानिरीक्षक रविकिरण गोवेकर, प्रतिनिधी कुंदन हाते आणि वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केले. त्यावेळी वाघाचे अनेक अवयव कापून नेल्याचे स्पष्ट झाले. उल्लेखनीय म्हणजे देवलापारपासून जवळच अंतरावर असलेल्या पवनी येथे टायगर सेलची बुधवारी बैठक झाली होती. मात्र, या बैठकीला महावितरणचे अधिकारी गैरहजर होते. या बैठकीच्या दुसऱ्या दिवशीच बीट गार्ड या भागात गेला असता नेमका वाघाच्या शिकारीचा प्रकार उघडकीस आला. वाघ तसेच वन्यजीवांची विजेचा शॉक देऊन शिकार करण्याच्या घटना उघडकीस येत असतानाही जंगलातून टाकण्यात येणाऱ्या विजेच्या लाईनवरील ट्रिपिंगकडे महावितरणचे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शिकारीच्या घटना तातडीने लक्षात नसल्याचा आरोप वन्यजीव संघटनांनी केला आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाचे नितीन देसाई यांनी देवलापारमधील शिकारीची घटना १५ दिवसांपूर्वीची असल्याचा अंदाज व्यक्त केला.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा