झंकारणाऱ्या तारा आणि त्यावरून अलगद फिरणारी सतारवादकाची बोटे हे संगीतप्रेमींना खिळवून देणारे दृष्य खरे.. सतारवादन हा भारतीय शास्त्रीय संगीतातील नावाजलेला असला तरी ही सतार घडते क शी? सतारवादनात माहीर असलेली, त्याची परंपरा वर्षांनुर्वष जपणारी घराणी कोणती? आणि आजच्या घडीला या सतारवादकांची अवस्था-व्यवस्था काय आहे? या प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी ‘नॅशलन सेंटर ऑफ परफॉर्मिग आर्ट्स’(एनसीपीए)च्या वतीने दोन वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन क रण्यात आले आहे.
एनसीपीए आणि इंडियन म्युझिऑलॉजिकल सोसायटीच्या वतीने शुक्रवारी, १६ जानेवारीला ‘सितार मेकिंग’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. एनसीपीएतील एक्सपिरिमेंटल थिएटरमध्ये सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून कार्यशाळेचे उद्घाटन प्रख्यात सतारवादक शुजाअत खान यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेत सतार वाद्याच्या निर्मितीत येणाऱ्या अडचणींचा ऊहापोह करण्यात येणार आहे. विविध सतारवादक आणि सरकारी अधिकारी यांच्यात होणाऱ्या चर्चेतून हा विषय विस्तृत स्वरूपात मांडला जाणार आहे.
तर ‘सतारवादनातील घराणी’ या विषयावर १७ आणि १८ जानेवारी अशा दोन दिवसांच्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सितार अॅण्ड इट्स घरानाज’ या चर्चासत्राचे उद्घाटन प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सिरकार यांच्या हस्ते करण्यात येईल. एक्सपिरिमेंटल थिएटरमध्येच सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत रंगणाऱ्या या दोनदिवसीय चर्चासत्रामध्ये सतारवादनातील सात प्रसिद्ध घराण्यांचा सहभाग असणार आहे. या सातही दिग्गज घराण्यांचे प्रतिनिधित्व करणारे सतारवादक आपापल्या घराण्याचे तपशीलवार अभ्यासात्मक सादरीकरण करणार आहेत.
धारवाड घराण्याचे उस्मान खान, एतवाह घराण्याचे शुजाअत खान, अरविंद पारीख, इंदौर घराण्याचे अब्दुल हलीम आणि जफर खान, मैहार घराण्याचे कार्तिक कुमार आणि शुभेंद्र राव आणि विष्णूपूर घराण्याचे मणिलाल नाग यांचा या चर्चासत्रात सहभाग आहे. त्याचबरोबर जयपूर बीनकार घराणे आणि लखनौ घराण्यातील सतारवादनाच्या परंपरेवर खास सादरीकरण केले जाणार आहे.

Story img Loader