नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा), आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि राज्यातील सर्व विद्यापीठांच्या वतीने येथील निमा हाउसमध्ये बुधवारी दुपारी चार वाजता ‘आयातीत उत्पादनांचे भारतीयकरण’ या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर माहिती देणार आहेत.
राज्यातील सर्व विद्यापीठांतील तज्ज्ञांनी केलेले सर्वेक्षण व संशोधनाद्वारे असे लक्षात आले की भारतामध्ये आजही अभियांत्रिकी, ऑटोमोबाइल, पर्यावरण व जैवविज्ञान क्षेत्रात लागणारे साहित्य तसेच आरोग्य क्षेत्रात आरोग्य तपासणी यंत्रे व सुटे भाग, शैक्षणिक क्षेत्राला लागणाऱ्या बाबी, विज्ञान क्षेत्रास लागणारे साहित्य हे सर्व आयात करण्यात येत असल्यामुळे भारतीय रुपयाच्या तुलनेने सदर साहित्य हे ३०० ते ४०० पटीने महाग ठरते.
भारतातील उत्पादन क्षमता पाहता ही सर्व उत्पादने भारतात वाजवी किंमत व गुणवत्तापूर्वक निर्माण होऊ शकतात, असे  निदर्शनास आले आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ. जामकर, ज्येष्ठ उद्योजक अशोक कटारिया, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी उद्योगांसाठी असलेल्या संधी लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आयात करण्यात येणारे हे साहित्य जर भारतातच उत्पादित झाले तर, पर्यायाने वस्तूंची किंमत कमी होईल. वस्तूंची सुविधा चांगल्या प्रकारे मिळू शकेल. खर्चही आटोक्यात येईल, तसेच व्यवसायही वाढेल. या सर्व बाबींवर कार्यक्रमात प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात उद्योजकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बेळे, मंगेश पाटणकर, किशोर राठी, मनीष कोठारी आदींनी केले आहे.