जैववायू प्रकल्प (बायोगॅस) राबवून अन्न शिजवण्यावरील खर्च वाचविताना वार्षिक १० लाख रुपये बचत होत असल्याचे जनकल्याण निवासी विद्यालयाने दाखवून दिले. राज्यातील अनुदानित आश्रमशाळांसाठी हा प्रकल्प पथदर्शी ठरला आहे.
रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीमार्फत लातूर तालुक्यातील हरंगुळ येथे चालविल्या जाणाऱ्या जनकल्याण निवासी विद्यालयाने भूकंपानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी जनकल्याण निवासी विद्यालय सुरू झाले. राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा वरदान ठरली. १८ जिल्हय़ांच्या ५९ तालुक्यांमधील ३४० गावांतील ४७७ मुले व ७९ मुली या शाळेत शिक्षण घेतात. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ३३ कुटुंबे शाळा परिसरात राहतात. साडेनऊ एकर जागेत ही शाळा चालवली जाते. सुमारे ७५० लोकांचे दोन वेळचे जेवण, दोन वेळचा नाश्ता यासाठी गॅसचा मोठा खर्च येत असे. पूर्वी घरगुती दराने शाळेला गॅस मिळत होता, मात्र केंद्राने गॅसचे अनुदान कमी केल्यानंतर १ हजार १३० रुपये दराप्रमाणे सिलिंडर खरेदी करावे लागते. दररोज तीन सिलिंडर लागत असल्यामुळे संस्थेवरचा आíथक भार मोठा होता. दहा वर्षांपूर्वी बायोगॅस प्रकल्प सुरू होता. मात्र, काही कारणामुळे तो बंद पडला.
संस्थेचे प्रकल्प कार्यवाह शिवदास मिटकरी व व्यवस्थापक सतीश पांचाळ यांनी बायोगॅसची निर्मिती पुन्हा सुरू करण्याचे ठरवले. विद्यार्थी-विद्याíथनींसाठी ११० शौचकूप आहेत. ते सर्व बायोगॅस टँकला जोडले. चार घनमीटरच्या दोन व सहा घनमीटरच्या तीन अशा पाच टाक्या आहेत. इंटरनेटवरून बायोगॅस प्रकल्पाची सर्व अद्ययावत माहिती संकलित केली. पूर्णपणे जैववायूवर अवलंबून राहायचे तर शाळेतील खरकटे १० किलोपेक्षा अधिक निघत नव्हते. कारण ताटात अन्नपदार्थ शिल्लक ठेवायचे नाही, पाहिजे तेवढेच घ्यायचे असे संस्कार विद्यार्थ्यांवर आहेत. लातूर शहरातील स्वप्नलोक, गंधर्व, वाडा, गायत्री व गायत्री रीट्रिट या पाच हॉटेलमधील खरकटे गोळा करून ते एक दिवसाआड शाळेवर नेण्याची व्यवस्था करण्यात आली. खरकटय़ाची विल्हेवाट लावणे ही हॉटेलचालकांसमोरील मोठी समस्या आहे. त्यांनी आनंदाने मोफत खरकटे देण्याचे मान्य केले. त्यातून दिवसाआड ३०० किलो खरकटे उपलब्ध झाले. पूर्वी गॅस सिलिंडर आणण्यासाठी लातुरात वाहन पाठवावे लागत होते. आता खरकटे नेण्यासाठी दिवसाआड वाहन येते. खरकटय़ाने भरलेले पिंप नेऊन रिकामे पिंप हॉटेलमध्ये ठेवले जातात.
जैन गोशाळेतील १ ट्रॅक्टर ट्रॉली भरून शेण दरमहा बायोगॅससाठी खरेदी केले जाते. खरकटय़ाचा उपयोग करून ७५०जणांचा दोन वेळचा स्वयंपाक, दोन वेळचा नाश्ता गोबरगॅसवर तयार करण्यासाठी संस्थेने थोडीशी गुंतवणूक करून पाइपलाइन दुरुस्त केली. नवीन स्टील टाकी बसवली. गॅस चांगल्या दाबाने उपलब्ध व्हावा, यासाठी कॉम्प्रेसर बसवले. परिणामी, पूर्वीप्रमाणे पुरेशा दाबाइतका गॅस उपलब्ध झाला व अशाप्रकारे संस्थेचा गॅसवरील वार्षकि १० लाख रुपये खर्च या उपक्रमामुळे वाचला.
जनकल्याण विद्यालयाने राबविलेला हा नावीन्यपूर्ण प्रकल्प पाहण्यासाठी मराठवाडय़ाच्या विविध भागांतून लोक येत असल्याचे प्रकल्प कार्यवाह मिटकरी यांनी सांगितले. ऊर्जेची बचत ही महत्त्वाची बाब आहे. नसíगक साधनांचा पुनर्वापर करण्याचे संस्कार विद्यार्थ्यांवर या प्रकल्पाच्या माध्यमातून आपोआप िबबवले जातात, असे त्यांनी सांगितले.
अनुकरणीय प्रयोग
एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर शहरातील हॉटेलमधील खरकटे गोळा करून निवासी शाळेत बायोगॅस निर्मिती होते. राज्यात अन्यत्र कुठेही असा प्रयोग होत नाही. सगळय़ाच शहरांमध्ये खरकटे मोठय़ा प्रमाणात वाया जाते. ते गटारीत टाकले जाते. त्यामुळे रोगराई पसरते. त्याचा बायोगॅससाठी उपयोग केल्यास तो स्वयंपाकाला वापरता येईल किंवा जनरेटरमार्फत वीजही उपलब्ध करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा