कल्याण डोंबिवली पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपने घेतलेला पुढाकार, त्याला काँग्रेसच्या नगरसेवकांनी दिलेली साथ यामुळे गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या आरोपांमुळे वादात सापडलेले पी. के.उगले यांना थेट शहर अभियंतापदी बढती देण्याचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
हा प्रस्ताव विषयपत्रिकेवर घेणाऱ्या महापौर वैजयंती गुजर सभेला सुरुवात करून निघून गेल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका माधुरी काळे यांनी या प्रस्तावास कडाडून विरोध केला. मात्र, महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून वावरणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी यावेळी मौन धारण केल्याने उगलेंच्या बढतीचा वादग्रस्त प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी संख्याबळाच्या जोरावर मंजूर करून घेतला. महापालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी उगले यांना शहर अभियंतापदी बढती देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत आणला होता. गेल्या वर्षी याच उगलेंना अनधिकृत बांधकामाबद्दल दोषी धरत निलंबित करण्याचा ठराव सत्ताधाऱ्यांनी मंजूर केला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रवीष्ट असताना उगले यांचा बढतीचा प्रस्ताव मांडून आयुक्त सोनावणे यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नगरसेविकेने या प्रस्तावास जोरदार विरोध केला असताना शिवसेनेचे कैलास शिंदे, रवी पाटील, अरविंद मोरे, काँग्रेसचे विश्वनाथ राणे, सचिन पोटे, नवीन सिंग उगले यांची पालिकेला कशी गरज आहे असे सांगून त्यांची पाठराखण केली. मनसेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी हे प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत मनसे याविषयी कुठलीच भूमिका घेणार नाही, असे सांगून उगले यांचे अप्रत्यक्ष समर्थन केले. मनसेच्या वैशाली दरेकर, पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेवर आवाज उठविणारे शरद गंभीररावही या विषयावर शांतपणे बसले होते. सेवाभरती नियमावली २०११ प्रमाणे उगले हे पदोन्नत्तीस पात्र आहेत, असे आयुक्त सोनवणे यांनी उगले यांची पाठराखण करताना सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा