रक्ताचे काही आजार हे अनुवंशिक असतात. परंतु नियमित व योग्य आहार घेतल्यास कर्करोगांसह इतर संभाव्य आजारांपासून सुटका होऊ शकते. माणसाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी पांढऱ्या पेशी कार्यरत असून त्यांचे प्रमाण वाढले तरी घाबरण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन डॉ. प्रीतेश जुनागडे यांनी केले.
येथील यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेत डॉ. जुनागडे यांचे ‘रक्तविकार व कॅन्सर, समज-गैरसमज’ या विषयावर व्याख्यान झाले. माणसाचे शरीर एक चमत्कार असून शरीरातील रक्त घटक या सर्वावर परिणाम करतो. आहारातील लोह व इतर जीवनसत्वांची कमतरता यामुळे आरोग्याचे विविध प्रश्न उपस्थित होतात. परंतु योग्य आहार व नियमितता यामुळे संभाव्य आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. माणसाच्या शरीरातील विविध रक्तपेशींना आयुष्य असून त्यातील लाल पेशी १२० दिवस तर पांढऱ्या पेशी फक्त दोन तास जगतात. शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत प्राणवायू न पोहचल्यास पेशींचा आजार होतो असेही डॉ. जुनागडे यांनी सांगितले. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णास दर महिन्याला रक्त घ्यावे लागते. जनुकांच्या दोषामुळे सिकलसेल होतो. हा आजार आदिवासींमध्ये मोठय़ा प्रमाणावर आढळतो. महिलांचे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे अनेक आजारांना आमंत्रण देणारे ठरते. प्रतिकार शक्ती कमी झाली की पेशींना त्यांचे कार्य करणे अवघड होते. अनियंत्रीत पेशींची वाढ होते व कर्करोगाला निमंत्रण मिळते. याविषयी आपल्याकडे बरेच गैरसमज आहेत. त्यांना बाजूला सारत व्यावहारिक विचार करण्याची गरज आहे. औषधांनी कोणीही बरे होत नाही. त्यासाठी मनशक्ती गरजेची आहे असेही ते म्हणाले. तणावमुक्त राहिल्यास डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार नाही असा सल्लाही त्यांनी दिला.
लग्न जुळवतांना रक्तगट या रकान्याची गरज काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्याकडे आजही विवाहप्रसंगी रक्तगट हा कळीचा मुद्दा ठरतो. वास्तविक रक्तगट व विवाह यांचा कुठलाही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रक्तगटाच्या घोळामुळे अनेकदा चांगली स्थळे नाकारली जाऊन आयुष्य बरबाद होण्याची वेळ येते असे डॉ. जुनागडे यांनी सांगितले.

Story img Loader