नवी मुंबई क्षेत्रफळापेक्षा दुप्पट क्षेत्रफळ असणाऱ्या रायगड जिल्ह्य़ातील नयना (नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र) क्षेत्रावर घर किंवा दुकान घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांचाही डोळा असल्याचे सानपाडा येथे चार दिवस झालेल्या मालमत्ता प्रदर्शनामुळे स्पष्ट झाले. त्यामुळे या क्षेत्राचा सिडकोने लवकरच लवकर विकास आराखडा तयार करावा, जेणेकरून विकासकांना मोठय़ा प्रमाणात जमीन उपलब्ध होईल, असा आशावाद या प्रदर्शनाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे. एमसीएचआयने आयोजित केलेल्या प्रदर्शनात सातशे कोटी रुपये किमतीच्या घरांची बुकिंग झाली असल्याचा दावा करण्यात आला असला तरी आर्थिक मंदीच्या या काळात केवळ बघ्यांची जास्त गर्दी असल्याची चर्चा आहे.
जागतिक आर्थिक मंदीच्या उंबरठय़ावर घर विक्रीसाठी मालमत्ता प्रदर्शनाचा दरवर्षी राबविण्यात येणारा फंडा यावर्षीदेखील नवी मुंंबईत कायम ठेवण्यात आला आहे. येत्या दोन महिन्यांत दोन वेगवेगळ्या बिल्डर संघटना हे प्रदर्शन भरविणार असून त्यावर करोडो रुपये खर्च केले जाणार आहेत. मागील शुक्रवारपासून चार दिवस पार पडलेल्या एमसीएचआय क्रेडाईच्या प्रदर्शनात ७० हजारपेक्षा जास्त ग्राहकांनी भेट दिल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. यापूर्वी अशा प्रदर्शनाला एक ते दीड लाख ग्राहकांची गर्दी खेचली जात होती, पण ती संख्या कमी झाल्याचे या प्रदर्शनाच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. या ७० हजारांत बघ्यांची गर्दी मोठय़ा प्रमाणात होती. त्यामुळे दीड ते दोन हजार ग्राहकांनी केवळ स्टॉल्सवरील बिल्डरांनी ठेवलेले माहिती अर्ज भरून दिलेले आहेत. या प्रदर्शनात १८० स्टॉल्स लावण्यात आले होते. त्यामुळे एका बिल्डराने दोन ते तीन प्लॅट विकल्याचा दावा उपाध्यक्ष प्रकाश बावीस्कर यांनी केला आहे. हे समीकरण लक्षात घेऊन ७०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा दावा करण्यात आला आहे, पण एका रियल इस्टेट कंन्सल्टंटच्या मते ही उलाढाल १०० कोटी रुपयांच्या वरदेखील गेलेली नाही. प्रदर्शनाच्या माध्यमातून
घर विक्री अत्यंत कमी होत असल्याचे ते म्हणाले. बिल्डरांनी एखादी स्कीम दिल्यास त्याबाबत ग्राहक थोडाफार विचार करतात, असे त्यांनी सांगितले. बावीस्कर यांनी अशी स्कीम ग्राहकांना दिली असून केवळ ६० टक्के पैसे देऊन घरांचा ताबा घ्या आणि शिल्लक ४० टक्के रक्कम दोन वर्षांत हप्त्याने चुकती करा, अशी ही स्कीम आहे. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांनी सिडकोच्या नयना क्षेत्राला पहिली पसंती दिली आहे. सिडकोकडील जमिनीचा साठा संपलेला असल्याने आता नयना क्षेत्रात शेतकऱ्यांकडे असणाऱ्या जमिनीला किंमत आलेली आहे. पेण, अलिबाग, खोपोलीपर्यंत पसरलेल्या या क्षेत्रात कमी किंमतीत घर उपलब्ध होण्याची ग्राहकांना आशा निर्माण झाल्याने ग्राहकांनी या भागातील प्रकल्पांची जास्त चौकशी केल्याचे विकासकांनी सांगितले. सिडकोने या भागाचा अद्याप विकास आराखडा तयार केलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. त्यामुळे सिडकोने हा आराखडा लवकर तयार केल्यास तेथील पायाभूत सुविद्या स्पष्ट होतील आणि या भागाचा सुनियोजित विकास होऊ शकले, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा