महापालिकेच्या परिवहन विभागाने केंद्रीय नगरविकास विभागाकडे सादर केलेल्या नवीन १०४ बस आणि पायाभूत सुविधांच्या प्रस्तावाला गुरूवारी मंजुरी मिळाली. यामुळे सध्या १३२ बस असलेल्या केएमटीच्या ताफ्यात नव्या करकरीत १०४ बसचा समावेश होणार आहे. तर पायाभूत सुविधांसाठी ७ कोटी ८० लाख रूपयांची विकासकामे होणार आहेत.
कोल्हापूर महापालिकेचा परिवहन (केएमटी)विभाग समस्यातून वाटचाल करीत आहे. हा विभाग सक्षम व्हावा याकरिता केंद्र शासनाकडे एक प्रस्ताव पाठविण्यात आला होता. नव्या बसेस खरेदी करण्यासाठी ४४ कोटी २४ लाख रूपयांचा, तर पायाभूत सुविधांसाठी १० कोटी ८९ लाख रूपयांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्याकरिता केएमटीचे व्यवस्थापक कोगेकर, अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले, पी.एन.गुरव आदी अधिकारी पाठपुरावा करत होते. अलीकडेच कामगारमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन केएमटीचा प्रस्ताव मार्गी लावण्याचे आवाहन केले होते. त्यावर पवार यांनी नगरविकास मंत्री कमल नाथ यांच्याशी संपर्क साधून केएमटीच्या प्रस्तावाला मान्यता देण्याबाबत सुचविले होते. गुरूवारी कमल नाथ यांच्या समवेत महापालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, संजय भोसले यांची बैठक झाली. या बैठकीत केएमटीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.    
नवीन १०४ बसेस खरेदी करण्याकरिता ३२ कोटी ८९ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. सध्या महापालिकेच्या ताफ्यात १०२ बसेस स्वमालकीच्या, तर भाडेतत्त्वावरील ३० अशा १३२ बसेस आहेत. केंद्र शासनाच्या अर्थसाहाय्यातून नव्या कोऱ्या १०४ बसेस दाखल झाल्यानंतर केएमटी सक्षम होण्याची चिन्हे आहेत. परिवहन विभागाने पायाभूत सुविधांसाठी १० कोटी ८९ लाख रूपयांचा प्रस्ताव पाठविला होता. आजच्या बैठकीत त्याकरिता ७ कोटी ७९ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून वर्कशॉप डेव्हलपमेंट, कंट्रोल पॉईंट यासह पायाभूत सुविधांची कामे होणार आहेत. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर असलेल्या या योजनेत कोल्हापूरने बाजी मारल्याने महापालिकेत आज आनंदाचे वातावरण दिसत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा