शहरातील गुंठेवारी भागात महापालिकेच्या वतीने ६९ टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यातील ११ टँकर महापालिकेचे आहेत, तर उर्वरित ५८ टँकरच्या किरायाचे दर व टँकरच्या पाण्याचे शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव महापालिकेत गुरुवारी नामंजूर करण्यात आला. अंदाजपत्रकात या अनुषंगाने तरतूद करण्यास मात्र मान्यता असल्याचे महापौर कला ओझा यांनी सांगितले. ऐनवेळी महापालिकेच्या प्रशासनाने आणलेल्या टँकर दरवाढीच्या ठरावावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
शहरातील काही भागांत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची सोय नाही. विशेषत: वॉर्ड अ आणि ड मध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. अमूल लॉरी सव्‍‌र्हिसेसमार्फत केल्या जाणाऱ्या टँकरच्या दरात वाढीव निविदा प्राप्त झाल्याने १ कोटी ४१ लाख ३२ हजार ४८० रुपये खर्चास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. १४ मे ते १३ जुलै या कालावधीत ६० टँकरची संख्या गृहीत धरून दर निश्चित करावेत, अशी विनंती प्रशासनाने केली होती. तसेच आíथक वर्षांत यासाठी ८ कोटी २३ लाख ९९ हजार रुपये खर्च होतील, असे गृहीत धरून टँकर भाडे असा लेखाशीर्ष अंदाजपत्रकात नमूद करावा, अशी विनंती करण्यात आली होती. तसेच पाणीपट्टी आणि टँकरचा खर्च गृहीत धरून टँकरच्या पाणीदरातही वाढ सुचविण्यात आली होती.
टँकरसाठी येणारा खर्च आणि प्रत्यक्ष मिळणारी रक्कम याची गणिते घालून महापालिकेला ३ कोटी २१ लाख २४ हजार ४०० रुपये एवढा खर्च महापालिका फंडातून करावा लागणार असल्याने टँकरने पाणीपुरवठा केल्यास ३०० रुपये प्रतिमाह प्रत्रिडम असे पाणी शुल्क आकारावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पाच हजार लिटर क्षमतेचा टँकर दर ४५० रुपये, तर १० हजार लिटर क्षमतेचा दर ८०० रुपयांपर्यंत वाढवावेत, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, सर्वसाधारण सभेत ही दरवाढ करू नये, असे नगरसेवकांनी सांगितले. आठ ते दहा महिन्यांपूर्वीच वाढ केल्यानंतर ऐनवेळी हा विषय कशासाठी ठेवण्यात आला, असा प्रश्न नगरसेवकांनी केला. महापौर कला ओझा यांनी पाणी शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव रद्द करण्याच्या सूचना दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा