प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राणी दत्तक योजनेला पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला असून आंतरराष्ट्रीय स्तरावरून वाघांना दत्तक घेण्यासाठीचे असंख्य प्रस्ताव महाराजबाग व्यवस्थापनाकडे येऊ लागले आहेत. वाघ, बिबट, कोल्हा आणि माकड या प्राण्यांसाठी सर्वाधिक चौकशी झाली. मोर दत्तक घेण्याची अनेक शाळांची इच्छा आहे. व्यक्ती आणि खाजगी कंपन्यांसाठीही ही योजना खुली असून अनेक कंपन्यांनी स्वत:हून प्राण्यांचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे.
महाराजबागेत एकूण ३५६ वन्यजीव आहेत. यात चार वाघ, आठ बिबट, तसेच माकडे, कोल्हे, अस्वल, नीलगाय, हरीण, मोर, इमू, मगर आणि असंख्य पक्ष्यांचा समावेश आहे. वन्यजीवांच्या पालनपोषणाचा आर्थिक भार आता सोसवण्यापलीकडे वाढत चालला आहे. वन्यप्राण्याचे रोजचे खाद्य, त्यांची सुरक्षितता, देखरेख, आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक अंगांनी या खर्चाची व्याप्ती वाढल्याने वन्यजीव संवर्धनाचा संदेश देतानाच वन्यप्राणी दत्तक योजनेच्या माध्यमातून लोकांनाही यात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने वन्यप्राणी दत्तक योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर अनेक लोकांकडून योजनेविषयी विचारणा केली जात आहे. विदेशातूनही असंख्य ई-मेल आले आहेत. चंदीगड, कोलकाता शहरांमध्ये योजना सफल ठरली असून यात आता नागपूरचाही समावेश होण्याची शक्यता आहे.
महाराजबाग प्राणिसंग्रहालयाने वाघासाठी वर्षभरासाठी सर्वाधिक १ लाख रुपये तर कृष्णमृगासाठी सर्वात कमी ४ हजार रुपये असा दर ठेवला आहे. दत्तक घेणाऱ्या व्यक्तीलाही याचे फायदे दिले जाणार असून त्याच्या कुटुंबातील पाच व्यक्तींसाठी एक वर्षांचा नि:शुल्क पास दिला जाणार आहे. दत्तक घेतलेल्या प्राण्याच्या पिंजऱ्यासमोर या व्यक्तीचे नाव प्रदर्शित केले जाईल. किमान १० हजार ते २५ रुपयांपर्यंत खर्च उचलणाऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. जर लोकांनी स्वत:हून खाद्य आणि आणि अन्य सुविधांसाठी खर्च उचलण्याची तयारी दर्शविली तर त्याचे स्वागत आहे, असे महाराजबागेचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांनी सांगितले. वन्यप्राणी कमीत कमी ३ ते ६ महिन्यांसाठीही दत्तक घेतले जाऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सदर योजना चंदीगड आणि कोलकाता येथील प्राणिसंग्रहलयांमध्ये प्रचंड यशस्वी ठरत असून खर्चाचा एक मोठा भाग लोकांच्या सहभागाने कमी झाल्याकडे बावस्कर यांनी लक्ष वेधले. मिळालेल्या माहितीनुसार वाघ दत्तक घेण्यासाठी सर्वाधिक मागणी येत आहे. आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालये आणि भारतीय प्राणिसंग्रहालयांमध्ये सदर योजना प्रचंड लोकप्रिय झाल्याच्या पाश्र्वभूमीवर महाराजबाग व्यवस्थापनही योजनेच्या यशाचे आराखडे बांधत असून चारही वाघांच्या पालनपोषणाचा खर्च आता भरून निघेल, असा आशेचा किरण निर्माण झाला आहे. यापेक्षाही संवर्धनाच्या कृतीतून लोकांची वन्यजीवांप्रती बांधिलकी अधिक सुदृढ होईल, असा विश्वास डॉ. बावस्कर यांनी व्यक्त केला.
१ लाखात वाघ दत्तक
देशभरातील अन्य प्राणिसंग्रहालयांच्या तुलनेत महाराजबागेतील दर कमी आहेत. अन्य प्राणिसंग्रहालयांमध्ये हत्ती, जिराफ, वाघ सिंह आणि चिम्पांझी यांच्यासाठी वार्षिक दीड लाखांचे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. नागपुरात मात्र १ लाखात वाघ दत्तक घेतल्याचा आनंद मिळू शकतो.

Story img Loader