नाटककार सुरेश चिखले यांचं ‘गोलपिठा’ हे नाटक येऊन आता बरीच वर्षे लोटली असली तरी त्यात त्यांनी चितारलेलं वेश्याजीवनाचं भीषण, दाहक वास्तव प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. तेच सुरेश चिखले पुन्हा एकदा ‘प्रपोजल’ या नाटकाद्वारे राधा नावाच्या एका वेश्येच्या जिंदगानीची फरफट आणि तिचा आधारवड बनू इच्छिणाऱ्या आणि त्याकरता सगळ्या समाजालाच आव्हान देण्याची जिगर उरी बाळगणाऱ्या एका जिंदादिल तरुणाची कहाणी घेऊन आपल्यासमोर आले आहेत.
सीएसटीहून कल्याणला जाणाऱ्या रात्रीच्या शेवटच्या रिकाम्या ट्रेनमध्ये चढलेल्या एका वेश्येची (राधाची) त्याच डब्यातून प्रवास करणाऱ्या निवृत्तीशी प्रारंभी तिला हात देण्यातून जुजबी संवादाला सुरुवात होते. दिवसभरात एकही गिऱ्हाईक न मिळाल्यानं निराश झालेल्या राधाला निवृत्तीमध्ये आपलं संभाव्य सावज दिसतं. परंतु तो पठ्ठय़ा तिला बिलकूल दाद देत नाही. फारच सिधासाधा, सरळ असतो तो. ती त्याला उत्तेजित करायची बरीच खटपट करते. पण तो बधत नाही. बोलण्या-बोलण्यातून ते परस्परांना जोखत राहतात. त्यातून त्यांच्यात परस्परांबद्दलच्या माहितीची जुजबी देवाणघेवाण होते. मधूनच त्यांच्यात वितंडवादही झडतो. परंतु त्यातूनच नकळत त्यांच्यात एक अनाम नातंही निर्माण होतं. वेळ घालवताना त्याला दारू, सिगारेट पाजण्यापर्यंत मजल गाठूनही मुद्दय़ाचं काही घडत नसल्यानं राधा अस्वस्थ, बेचैन होते. मधेच काही कारणास्तव गाडी खोळंबते. एव्हाना रात्रीचा दीड वाजलेला असतो. त्याला झोप अनावर होते. तीही बाकावर आडवी होते. तिलाही झोपेनं घेरलेलं असतंच. तिचा डोळा लागतो. इतक्यात एक भुरटा चोर डब्यात शिरतो आणि तिच्या उशाखालची पर्स घेऊन पसार होऊ बघतो. त्या धक्क्य़ानं तिला जाग येते. ती त्याच्याकडून आपली पर्स खेचून घ्यायला धडपडते. तेव्हा तो चाकू काढून तिला धमकावतो. त्यांच्या झटापटीत चाकू छातीत घुसून चोर तिथंच गतप्राण होतो तेव्हा ती घाबरते. निवृत्तीला जागं करून ‘आपण पळून जाऊया, नाहीतर नस्तं झेंगट मागे लागेल,’ म्हणून त्याला सांगते. एव्हाना त्याच्या डोळ्यावरची झोप पुरती उडालेली असते. तो तिला आपली खरी ओळख देतो आणि अटक करतो..
मध्यंतरी काही वर्षांचा काळ लोटतो. पुन्हा एके रात्री त्याच शेवटच्या लोकलने राधा तिच्या दलालाबरोबर धंद्याचा हिशेब करत प्रवास करीत असताना निवृत्ती तिला गाठतो. तिची माफी मागू पाहतो. पण ती त्याला साफ झिडकारते. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यातली पाच वर्षे तुरुंगात बरबाद झाली म्हणते. तो तिची समजूत काढू बघतो. त्याच्या त्या अजिजीनं काहीशी वैतागूनच ती त्याला- ‘जा. तुला माफ केलं, आता चालता हो,’ म्हणून फर्मावते. पण तरी तो जात नाही. त्याला तिला काहीतरी वेगळंच सांगायचं असतं. तो परोपरीनं तिला ते सांगू पाहतो. ती त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करते. पण तो हटत नाही. शेवटी चिडून ती त्याला- ‘काय सांगायचंय तुला? आता सांगण्यासारखं काय उरलंयच काय?’ असा प्रश्न करते. ‘मला तुझ्याशी लग्न करायचंय..’ तो हिंमत एकवटून सांगून टाकतो. ती आधी त्याला हसण्यावारीच नेते. पण तो काही केल्या आपला हेका सोडत नाही. तेव्हा ती त्याला कठोर वास्तवाची जाणीव करून देते. तरीही तो ऐकत नाही. आपण तिच्यासाठी सगळ्या जगाशी पंगा घ्यायला तयार आहोत, असं ठामपणे सांगतो. तिच्या बिरादरीच्या लोकांना आपण सन्मानानं लग्नाला बोलवू, असं म्हणतो. त्याच्या त्या वज्र निर्धारामागची धग तिलाही आत कुठंतरी जाणवते. हलवून सोडते. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहतात. तिच्या आयुष्यातला तो अत्युच्च आनंदाचा क्षण असतो.
पण..
मुंबईतल्या लोकलच्या एका डब्यात हे संपूर्ण ‘नाटय़’ घडतं. लेखक सुरेश चिखले यांनी दोनच पात्रांचं हे नाटक अत्यंत कुशलतेनं रचलं आहे. फक्त दोनच पात्रांमध्ये अख्खं नाटक घडवायचं म्हणजे त्याची एकांकिका होण्याची भीती संभवते. परंतु ‘प्रपोजल’ने हा धोका सहजगत्या पार केला आहे. या कथेत नेहमीचीच अपेक्षित वळणंवाकणं असली तरीही प्रेक्षक त्यांत गुंतत जातो याचं कारण यातल्या पात्रांच्या ठायी असलेलं सच्चं माणूसपण! ही माणसं खरीखुरी, हाडामांसाची आहेत. यातली राधा परिस्थितीवश अध:पतित झाली असली तरीही ती आपल्या मूल्यांशी ठाम आहे. निवृत्तीचा तर प्रश्नच नाही. त्याच्यावर संस्कारच अशा एका देवमाणसाचे घडले आहेत, की तो याहून वेगळा घडता तरच नवल. एक मात्र आहे- अशा संस्कारांतला आणि ज्या पाश्र्वभूमीत निवृत्ती वाढला, ती पाहता सुरुवातीला राधाशी तो ज्या प्रकारे वागतो, बोलतो ते पुढे जाऊन गैर वाटतं. कदाचित नाटय़पूर्णतेसाठी अशी अविश्वसनीय मांडणी लेखकानं केली असावी. तसंच राधाही पुढे वेश्यांची मालकीण झाल्यावर पूर्वीसारखीच लोकलच्या डब्यात पैशांचा हिशेब करत बसलेली दाखवणं, हेही बिलकूल न पटणारं आहे. रात्री उशिरा घरी परतताना बारबालांच्या बाबतीत पैशांची अशी वाटणी लोकलमध्ये होत असल्याचं पाहण्यात आलं होतं. परंतु पदरी अनेक वेश्या बाळगणाऱ्या मालकिणीवर ही वेळ यावी, हे पचायला अंमळ कठीणच. निवृत्ती आणि राधा या दोघांच्या पूर्वकथाही याआधी साहित्य-नाटय़-चित्रपटांतून अनेकदा घासूनपुसून गुळगुळीत झालेल्या आहेत. असं असलं तरीही हे नाटक आपली पकड घेतं, आपल्याला बांधून ठेवतं, याचं कारण यातल्या सशक्त व्यक्तिरेखा, त्यांचं अस्सल माणूसपण आणि कलाकारांच्या जबरदस्त परफॉर्मन्स यात दडलं आहे. ‘धावत्या लोकलच्या डब्यातलं नाटक’ ही अभिनव कल्पनाही व्यावसायिक रंगमंचावर (तीही वास्तवदर्शी पद्धतीनं!) पहिल्यांदाच येत असल्यानं तिचाही नाटकाच्या यशात महत्त्वपूर्ण वाटा आहे.
दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी नाटकाच्या संहितेतील दोषांकडे काणाडोळा करून त्यातल्या माणसांच्या माणूसपणावर भर देत प्रयोग मंचित केला आहे. ही माणसं आपली.. आपल्यातलीच वाटावी इतक्या खरेपणानं व्यक्त झाली आहेत. अस्सल वातावरणनिर्मितीनं हे नाटक अर्धी लढाई जिंकतं. या नाटकातल्या काही त्रुटी वा दोषांचं (अप)श्रेय दिग्दर्शकाकडेही जातं. नाटय़स्थळ आणि पात्रांच्या व्यवहारांतील तोच तोपणात खंड पाडण्यासाठी झोपलेला प्रवाशी, चरसी भिकारी, भुरटा चोर यांची योजना नाटकात केलेली असली, तरी ज्या तीव्रतेनं (इंटेसिटी) त्यांचा वापर व्हायला हवा होता तसा इथं होत नाही. विशेषत: भुरटय़ा चोराची राधासोबतच्या झटापटीत झालेली हत्या प्रेक्षकांच्या मनावर नीटशी बिंबतच नाही. इतक्या कॅज्युअली ते घडलेलं दाखवलं आहे. त्यामुळे पहिला अंक लुटूपुटूच्या लढाईत वाया गेलाय अशी भावना होते. दुसरा अंक मात्र भावप्रक्षोभक आहे. भावभावनांची अलवार आंदोलनं त्यात आहेत. ती अत्यंत उत्कटतेनं व्यक्त होतात. कलाकारांकडून ही स्पंदनं काढवून घेण्यात दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांचं कौशल्य दिसून येतं. भावप्रक्षोभाचा हा संवेदनशील आलेख त्यांनी सूक्ष्मतेनं प्रयोगात उतरवला आहे.
नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी रंगमंचावर साकारलेली धावती लोकल प्रेक्षकाला थक्कच करते. मागे पडणारी स्टेशनं आणि त्या पाश्र्वभूमीवर डब्यातल्या पात्रांमध्ये घडणारं भावनाटय़ मुळ्ये यांच्या विलक्षण नेपथ्यप्रतिभेमुळेच जबरदस्तपणे प्रत्ययाला येतं. त्यांच्या वास्तव प्रकाशयोजनेचाही वातावरणनिर्मितीत सिंहाचा वाटा आहे. राहुल रानडे यांनी रेल्वेप्रवासातील विविध आवाज, त्यांची गती, लय यांचा अस्सल प्रत्यय पाश्र्वसंगीतातून दिला आहे. गीता गोडबोले यांनी राधाला दिलेली वेशभूषा आणि त्यात काळानुरुप झालेले बदल यथार्थ आहेत. पण दुसऱ्या अंकात लोकलमध्ये प्रवेश करतानाची निवृत्तीची वेशभूषा मात्र त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करता न पटणारी आहे. ती गुप्तहेर छापाची वाटते. बाकी चरसी भिकारी, प्रवाशी आणि भुरटा चोर फक्कड. शरद सावंत यांच्या रंगभूषेनं त्यांना अस्सलता दिली आहे.
आदिती सारंगधर यांनी यात साकारलेली राधा बेमिसाल आहे. राधाचं अवघं जगणं, तिची चिरंजीव वेदना त्यांनी समर्थपणे प्रकट केली आहे. राधाचं वागणं-बोलणं, असंबद्ध व्यवहार, देहबोलीतली अस्थिरता, मुद्राभिनय या साऱ्यांच्या वापरातून तिला हाडामांसाचं शरीर आणि आत्मा देण्यात आदिती सारंगधर कुठंही कमी पडल्या नाहीत. ‘प्रपोजल’मधील त्यांच्या राधाच्या रूपानं एका अत्यंत परिपक्व अशा अभिनेत्रीचं दर्शन प्रेक्षकांना घडतं. डॉ. अमोल कोल्हे यांनी निवृत्तीचं निरागस, साधं-सरळ, पापभिरू व्यक्तिमत्त्व अचूक टिपलं आहे. दुसऱ्या अंकातला घायाळ प्रेमीही त्यांनी तितक्याच उत्कटतेनं साकारला आहे. संहितेत त्यांच्या चित्रणात उणिवा न राहत्या तर ही व्यक्तिरेखा आणखीन अधिक उंचीवर गेली असती. राजन ताम्हाणे यांनी आपल्या वाटय़ाला आलेल्या स्वल्प भूमिका लक्षवेधी केल्या आहेत. तेवढं चोराचं मरण सोडून! एकुणात एक तरल, भावव्याकुळ नाटक पाहिल्याचा अनुभव ‘प्रपोजल’ पाहताना येतो, यात काहीच संशय नाही.
नाट्यरंग : ‘प्रपोजल’ उत्कट, तरल क्षोभनाटय़
नाटककार सुरेश चिखले यांचं ‘गोलपिठा’ हे नाटक येऊन आता बरीच वर्षे लोटली असली तरी त्यात त्यांनी चितारलेलं वेश्याजीवनाचं भीषण, दाहक वास्तव प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. तेच सुरेश चिखले पुन्हा एकदा ‘प्रपोजल’ या नाटकाद्वारे राधा नावाच्या एका वेश्येच्या जिंदगानीची फरफट आणि तिचा आधारवड बनू इच्छिणाऱ्या आणि त्याकरता सगळ्या समाजालाच आव्हान देण्याची जिगर उरी बाळगणाऱ्या एका जिंदादिल तरुणाची कहाणी घेऊन आपल्यासमोर आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-12-2012 at 01:16 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proposal craving subtle irritating drama