कल्याण-डोंबिवली पालिका शाळेत कलेची आवड असलेल्या मुलांसाठी संगीत तसेच नृत्य शिक्षक नेमण्याचा प्रस्ताव शिक्षण मंडळाच्या सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात आला. शिक्षण मंडळ समिती सदस्या अर्चना जोशी यांनी कल्याण-डोंबिवली पालिका शाळांमध्ये अनेक गुणवान विद्यार्थी आहेत असे सांगितले. हे विद्यार्थी शाळेच्या माध्यमातून संगीत, अभिनय आणि नृत्य क्षेत्रात उत्कृष्ट असे कार्यक्रम सादर करतात. या विद्यार्थ्यांमधील कलेला संबधित विषयांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभल्यास विद्यार्थी चांगली कामगिरी करून प्रगतीकडे वाटचाल करू शकतात, असा मुद्दा सदस्या अर्चना जोशी यांनी मांडला. परंतु अशा प्रकारचे शिक्षक नेमण्याची तरतूद नाही असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. पण सर्व शिक्षा अभियानात हस्तकला, चित्रकला, शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून आपण असे प्रशिक्षण मुलांना देऊ शकतो, असेही प्रशासनाने सांगितले. विद्यार्थ्यांचे हित पाहून हा विषय मंजूर करण्यास काहीच हरकत नव्हती. यासाठी विशेष बाब म्हणून महासभा, आयुक्तांकडे विनंती करता आली असती. पण विद्यार्थ्यांपेक्षा अन्य हित महत्त्वाचे असल्याने या विषयाचे गांभीर्य प्रशासनासह कोणालच कळले नाही, असे सांगून अर्चना जोशी यांनी हा विद्यार्थी हिताचा मुद्दा फेटाळल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.