पाकिस्तानी सैन्याने केलेला गोळीबार व त्यामध्ये मराठा लाईफ इन्फट्रीचा जवान कुंडलिक माने यांच्यासह पाच सैनिकांना आलेले वीरमरण या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी कोल्हापूर जिल्हय़ामध्ये उमटले. शहर व ग्रामीण भागामध्ये पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवत जोरदार निदर्शने करण्यात आली. पाकिस्तानच्या ध्वजावर चपलांसह लाथा झाडत तरुणांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. कुंडलिक माने यांच्या पिंपळगाव बुद्रुक (ता.कागल) या गावात पाकिस्तानी ध्वज जाळण्यात आला. सायंकाळी येथे तिरडी मोर्चा काढून पाकिस्तानचा निषेध नोंदविण्यात आला.     
जम्मू काश्मीर नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी सैन्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये पाच जवान शहीद झाले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हय़ातील कुंडलिक माने या छत्तीसवर्षीय जवानाचा समावेश आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्हय़ात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पिंपळगाव बुद्रुक या कुंडलिक माने यांच्या गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन पाकिस्तानचा ध्वज जाळला. मुरगुड (ता.कागल) येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, प्रवीण सावंत, अशोक पाटील, प्रकाश पाटील, महिला संघटक सुषमा चव्हाण, रंजना आंबेकर, विद्या गिरी यांच्यासह शिवसैनिकांनी हुतात्मा चौकामध्ये पाकिस्तानी ध्वजाची होळी केली.    
येथील शिवाजी चौकात युवासेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. युवासेनेचे जिल्हा अधिकारी हर्षल सुर्वे, संदीप पाटील, अजिंक्य चव्हाण, सचिन पाटील, अक्षय चाबूक आदींनी पाकिस्तानच्या हल्ल्याचा निषेध नोंदविला. पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडविला. त्यावर चपलांचे प्रहार करण्यात आले. या वेळी हर्षल सुर्वे म्हणाले, शासनाने शहीद कुंडलिक माने यांच्या कुटुंबीयांना केलेली पाच लाख रुपयांची मदत अपुरी आहे. क्रिकेटपटूंवर कोटय़वधी रुपयांची उधळण केली जाते. देशासाठी धारातीर्थी पडलेल्यांना तुटपुंजी मदत केली असून ती भरीव स्वरूपात वाढविण्याची मागणी त्यांनी केली.     
सायंकाळी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची प्रतीकात्मक तिरडी मोर्चा काढण्यात येऊन पाक ध्वज जाळण्यात आला. पाक सरकारचा निषेध असो, संरक्षणमंत्री अँटनी यांचा निषेध असो, शहीद जवान अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.आमदार क्षीरसागर, नगरसेवक संभाजी पाटील, उपशहर प्रमुख दुर्गेश लिंग्रज यांनी पाकिस्तानी हल्ल्याचा निषेध नोंदविला.    
इचलकरंजी येथे कॉ. के. एल. मलाबादे चौकात शिवसेना, भाजप, मराठा महासंघ यांच्या वतीने निदर्शने करून हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आली. ईद आणि गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना पाकिस्तानने केलेला हल्ला भ्याड स्वरूपाचा आहे. पाकिस्तानविरोधात भारताने आक्रमक धोरण घ्यावे, असे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले. शिवसैनिकांनी पाकिस्तानविरोधी निदर्शने करून ध्वज जाळला. शहरप्रमुख धनाजी मोरे, मलकारी लवटे, सचिन खोंद्रे उपस्थित होते. मराठा विद्यार्थी सेनेच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. संतोष कांदेकर, अमित गडकरी, मंगला देसाई, दीपा पुजारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी शहर भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आमदार सुरेश हाळवणकर यांनी शहीद कुंडलिक माने यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत चोवीस तासात द्यावी, अशी मागणी केली. शहराध्यक्ष विलास रानडे, गोपाल जासू, वैशाली नायकवडे, अ‍ॅड. भरत जोशी यांची भाषणे झाली.
शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवाजी चौकामध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला कायमचे नेस्तनाबूत करण्याची गरज शहराध्यक्ष महेश जाधव यांनी व्यक्त केली. विजय जाधव, किशोर घाटगे, संतोष भिवटे, सुभाष रामुगडे, अ‍ॅड. संपतराव पवार, गणेश देसाई, डॉ. शेलार आदी उपस्थित होते. पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
 
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा