खासगी विनाअनुदानित शाळांकडून फी वाढ, शैक्षणिक साहित्य खरेदी एकाच दुकानातून करण्याची सक्ती, वर्षभराची फी आगाऊ घेणे अशा मार्गानी पालकांची लूट केली जात असल्याने अशा शाळांच्या विरोधात शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पालक व शिक्षकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. नाशिकमध्ये याआधीही अनेक शाळांच्या मनमानीविरोधात वेळोवेळी पालक व शिक्षकांनी आंदोलने केली आहेत. रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचा लढा वर्षभरापासून सुरू आहे. शाळेच्या दहशतीला बळी न पडता वर्षभर पालक आणि विद्यार्थीही ठामपणे न्याय मागत आहेत. शासनाच्या प्रत्येक सक्षम अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकार कक्षेचा उपयोग करण्यास भाग पाडून आणि बालहक्क संरक्षण आयोगाची मदत घेत हा लढा कधीच पूर्णत्वाला गेला असता परंतु काही शासकीय अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे तो अजूनही सुरू आहे. त्यामुळे या शाळेच्या पालकांनीही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मंचच्या वतीने करण्यात आले आहे. सिल्व्हर ओक या शाळेच्या नवीन व्यवस्थापनाने शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या संस्थेचा राजीनामा देऊन करारावर नवीन संस्थेत येण्यासाठी दबाव टाकल्याचे मंचने म्हटले आहे. ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी त्याला नकार दिला त्यांना व्यवस्थापनाने दीड वर्षांपासून दहशतीखाली ठेवले आहे. तरीही या शिक्षक कर्मचाऱ्यांनी संघटना उभारून लढा सुरू ठेवला आहे. या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मुलांचे निकाल अडवून धरले असल्याचा आरोपही मंचने केला आहे. ही कैफियतही जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडण्यात येणार आहे. अशोका युनिव्हर्सल शाळेचे पालकही फीवाढीसंदर्भात एकत्र आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा