महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर अहमदनगर येथे दगडफेक झाल्याची नांदेड जिल्ह्य़ात तीव्र प्रतिक्रिया उमटली. ‘पत्थर का जवाब पत्थरसे’ पद्धतीने राज समर्थकांनी प्रत्युत्तर दिल्याने खळबळ उडाली. दरम्यान, जिल्ह्य़ात घडलेल्या प्रकाराबाबत मनसेच्या ३० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, तर २५जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी सांगितले.
राज ठाकरे मराठवाडय़ाचा दौरा करून मंगळवारी रात्री नगरला पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची खिल्ली उडवली. मात्र, त्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. नगरला घडलेल्या प्रकाराची माहिती येथे मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी वाहनांना लक्ष्य केले. भोकर येथे एस. टी. बस जाळण्यात आली. जाळपोळीत बस खाक झाली. एस. टी. महामंडळाचे यात १३ लाखांचे नुकसान झाले.नांदेड शहराच्या वजिराबाद भागात माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर यांच्या घराखाली उभ्या असलेल्या त्यांच्या मुलाच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या.
राज समर्थकांनी शहरात दोन शासकीय वाहनांनाही लक्ष्य केले. लोहा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा जाळून मनसे कार्यकर्त्यांनी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या संपर्क कार्यालयासमोर बॅनर फाडले. लोहा-कंधार रस्त्यावर एका बसवर दगडफेक करण्यात आली.
जिल्ह्य़ात दिवसभर राडा सुरू होता.मनसे कार्यकर्त्यांनी अचानक सुरू केलेल्या या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेला सकाळपासून नवे काम मागे लागले. वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत. भोकरच्या बस जाळण्याच्या घटनेत ३०७ कलम लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा