त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा, कसबेपाडा, राजवीरपाडा या भागातील पाणी योजनांचे निकृष्ठ तसेच अपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी मनसेचे तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी सोमवारी येथे धरणे आंदोलन केले. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी योजनांचे काम जिल्हा परिषदेच्या वतीने पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा व गोदडय़ाचा पाडा पाणी योजना २००५ मध्ये मंजूर झाली. त्यासाठी १८ लाख रूपये मंजूर करण्यात आले होते. याशिवाय लव्हाळेपाडय़ासाठी नऊ लाख रूपये, कसबेपाडय़ासाठी नऊ लाख ६३ हजार रूपये पाणी योजनांसाठी मंजूर करण्यात आले होते. या पाणी योजनांसाठी असलेल्या समितीचे अध्यक्ष पोलीसपाटील होते. ही कामे करताना त्यांचा दर्जा योग्य राखल गेला नाही. काही कामे अपूर्णच ठेवण्यात आली. त्यामुळे ऐन दुष्काळी परिस्थितीत गावांना पाणी मिळणे मुश्किल झाले. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, यासाठी पंचायत समितीवर ग्रामस्थांनी मोर्चाही काढला होता. परंतु तरीही दखल घेतली न गेल्याने कोठुळे यांनी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्या परिसरातील पाणी योजनेची कामे जिल्हा परिषदेच्या वतीने करण्याचे आश्वासन दिले. परंतु कोठुळे यांनी त्यासंदर्भात लेखी मागितले असता अधिकाऱ्यांनी ते दिले नाही.
अखेरीस वाघेरा, गोदडय़ाचा पाडा, कसबेपाडा या परिसरातील ग्रामस्थांसह कोठुळे यांनी सोमवारी नाशिक येथे धरणे आंदोलन सुरू केले.
या आंदोलनाची दखल घेत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेमार्फत काम करण्याचे लेखी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती कोठुळे यांनी दिली.
पाणी योजना पूर्ण करण्यासाठी आंदोलन
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा, कसबेपाडा, राजवीरपाडा या भागातील पाणी योजनांचे निकृष्ठ तसेच अपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी मनसेचे तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी सोमवारी येथे धरणे आंदोलन केले.
First published on: 19-02-2013 at 01:46 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest for water project completion