यवतमाळ, अकोल्यात रास्ता रोको, पुतळ्याचे दहन आणि शांती संदेश यात्राही
बुध्दगया येथील महाबोधी विहार परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेचा यवतमाळ जिल्ह्य़ात सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. जिल्ह्य़ात सर्वत्र रेडअलर्ट जाहीर केला आहे.
येथील बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून नागरिकांनी भव्य मोर्चा  काढून, काळ्याफिती लावून बॉम्बस्फोटाच्या घटनेच्या निषेधार्थ असंतोष प्रगट केला आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांना एक निवेदन दिले.
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जिल्ह्य़ात सर्वत्र रेडअलर्ट जाहीर केला आहे. जिल्ह्य़ातील सर्व ठाणेदारांना धार्मिक स्थळे, संवेदनशील परिसर आणि गर्दीच्या ठिकाणावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांना दिलेल्या निवेदनाच्या वेळी भदन्त विपस्सी, अ‍ॅड.जयसिंग चव्हाण, विपस्सी स्थवीर, भिक्खुनी आर्या, नाना भगत, गोिवद मेश्राम, अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, रमेश जीवने, संजय बोरकर, राणा गणवीर, राजू रामटेके यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकत्रे हजर होते.
अकोल्यातही अशोक वाटिकेत बौद्ध बांधवांची निषेध सभा झाली, तर भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीनेही शहरात ठिकठिकाणी निदर्शने केली. येथील जठारपेठ चौकात भारिप-बमसंच्या कार्यकर्त्यांंनी रास्ता रोको करून एका दुकानासह ऑटोची मोडतोड केली. भाजप नेत्यांनी येथील मदनलाल धिंग्रा चौकात रास्ता रोको आंदोलन करताना या स्फोटांना नितीशकुमार सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. या आंदोलनात आमदार गोवर्धन शर्मा, डॉ.अशोक ओळंबे, सुनील शिरसाट, गिरीश गोखले, बाळ टाले, दीपक मायी, चांदखा आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुका पाहता अशा घटनांचा निषेध केला नाही तर आपल्या पक्षावर टीका होऊ शकते आणि जनमानसावर विपरीत परिणाम होतो, ही बाब ध्यानात घेऊन राजकीय पक्षांनी निषेध केल्याचे दिसून आले. काँग्रेस व राष्ट्रवादीनेही दोष लागू नये म्हणून या दुर्दैवी घटनेचा निषेध केला आहे. बौद्धांच्या अनेक संघटनांनी घटनेचा निषेध केला आहे. काही ठिकाणी त्यांनी पुतळ्याचे दहन केले, तर काही ठिकाणी रास्ता रोको व तोडपोड केली.
दरम्यान, बौद्ध भिक्खुंनी शहरातून शांती संदेश मिरवणूक काढली. अशोक वाटिकेनजिकच एका नेत्याने गडबड न करण्याचा इशारा आपल्या सहाय्यकास दिला. जठारपेठ चौकात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना सायंकाळी पोलिसांनी सोडून दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा