गोंडपिंपरी तालुक्यातील कन्हाळगाव व झरण वनपरिक्षेत्रात दहा लाख रुपयावर भ्रष्टाचार करून मजुरीपासून वंचित ठेवल्याने श्रमिक एल्गारच्या नेतृत्वाखाली वनविकास महामंडळाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
वनविकास महामंडळाच्या कन्हाळगाव व झरण वनपरिक्षेत्रात बांबू कटाई, बिट कटाईचे काम मध्यप्रदेशातील बालाघाट व अहेरी तालुक्यातील स्थानिक मजुरांकडूनही करवून घेण्यात आले. तीन महिन्यांपासून या मजूरांना मजुरी दिलेली नाही. त्यामुळे बाहेरील मजूर सात ते आठ दिवसांपासून मजुरीसाठी वनपरिक्षेत्र कार्यालयात भटकत होते, परंतु त्यांना मजुरी देण्यात आली नव्हती.
आज त्याचे वाटप करण्यात येत होते, परंतु मजूरांना कोऱ्या मस्टरवर सह्य़ा घेऊन मजुरी दिली जात होती. बांबू कटाईचे दर ३.५० रुपये ठरविलेले असतांना फक्त दोन रुपये दराने दिली जात होते. होळीचा सण असल्याने काही मजूर सह्य़ा घेऊन कमी मजुरी देऊन पाठविण्यात आले. त्यामुळे मजुरांमध्ये असंतोष पसरला व स्थानिक त्यांनी याबाबत श्रमिक एल्गारकडे माहिती दिल्याने अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी याची दखल घेऊन येथील वनविकास महामंडळाच्या कार्यालयापुढे मजुरांसह आंदोलन सुरू केले आहे. यात लहान मुलांसह महिला बालाघाट, अहेरी व स्थानिक मजुरांचाही सहभाग आहे.
श्रमिक एल्गारचे विजय सिध्दावार, विजय कोरेवार, डॉ.कल्याणकुमार, प्रवीण चिचघरे, उषा अलाम, वर्षां वासेकर, रमेश नैताम आदी कार्यकर्ते सहभागी आहेत.मजूर कोरे मस्टरही कार्यालयात घेऊन आलेले आहेत. मजुरीसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Story img Loader