दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर आता विदर्भातील खासदारांच्या निवासस्थानासमोर २ ऑगस्टला ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर विदर्भातील नेते आंदोलन करतील.
विदर्भ आंदोलन समितीची नुकतीच जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांंची माजी पोलीस महासंचालक आणि विदर्भवादी नेते प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या उपस्थितीत बैठक झाली असून त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनाबाबत माहिती देताना विदर्भवादी नेते आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक राम नेवले यांनी सांगितले, दिल्लीच्या आंदोलनानंतर विदर्भातील खासदारांना विदर्भासाठी संसदेत बोलते करावे यासाठी खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. नितीन गडकरी यांच्या महालातील वाडय़ासमोर दुपारी १२ ते ५ या वेळेत आंदोलन करण्यात येईल. गडकरींनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी वैदर्भीय जनतेला आश्वासन दिले होते. केंद्रात भाजपाचे सरकार आले की विदर्भ देऊ, अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यामुळे त्यांनी दिलेले वचन पाळावे यासाठी गडकरींच्या निवासस्थानासमोर बसणार आहे. विदर्भाच्या आश्वासनाची पूर्ती करण्यास मोदी सरकारवर दबाव वाढवून विदर्भाची घोषणा करावी, अशी मागणी गडकरी यांना करण्यात येणार आहे. गोळीबार चौकात सर्व कार्यकर्त्यांंनी एकत्र जमावे आणि तेथून मोर्चा घेऊन गडकरी वाडय़ावर जाणार आहे. विदर्भातील विविध लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या निवासस्थानासमोर त्या त्या जिल्ह्य़ातील विदर्भवादी नेते ठिय्या आंदोलन करतील. बैठकीला अॅड. नंदा पराते, नागपूर शहर अध्यक्ष दिलीप नरवाडिया, धर्मराज रेवतकर, राजेश श्रीवास्तव, विलास गजघाटे, उमेश निनावे, शेर खा पठाण आदी विदर्भवादी नेते उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jul 2014 रोजी प्रकाशित
स्वतंत्र विदर्भासाठी गडकरींच्या वाडय़ासमोर ठिय्या आंदोलन
दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर आता विदर्भातील खासदारांच्या निवासस्थानासमोर २ ऑगस्टला ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 31-07-2014 at 08:25 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest in front of nitin gadkari house