नरेंद्र दाभोळकरांनंतर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापुरात झालेल्या त्याच स्वरूपाच्या जीवघेण्या हल्ल्यानंतर जनमानसात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. दाभोळकरांच्या मारेक ऱ्यांना अद्याप शोधू न शकलेले राज्य सरकार या प्रकरणात हल्लेखोरांवर कारवाई करेल याबाबत शंकाच असल्याचे मत नागपुरातील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. शहरातील विविध संघटनांनीही निदर्शने करीत पानसरेंवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
धर्माध शक्तींना या राज्यातील परिवर्तनवादी व्यक्तीच नष्ट करावयाच्या आहेत, असा आरोप कम्युनिस्ट नेते मोहन शर्मा यांनी केला. दाभोळकरांचा विवेकाचा विचार पुढे नेण्याचे काम पानसरे करीत होते व याच विचारासाठी ते आयुष्यभर झटले. धर्माध शक्तींकडून धमक्या येत असल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यांच्यावरील हल्ला हे लोकशाहीवर व समाजपरिवर्तनाच्या चळवळीवरील आक्रमण आहे व ते मोडून काढण्यासाठी सुसंस्कृत समाजाने उभे राहावे. राज्य सरकारने या गुंडांवर ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी शर्मा यानी केली.
ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यानी पानसरे यांच्यावरील हल्ला हा राज्यातील पुरोगामी शक्तींवरील व संविधानावरील हल्ला असल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाला नष्ट करण्यासाठी करण्यात आलेला हा हल्ला आहे. प्रबोधन व परिवर्तनाच्या चळवळीसाठी हा धक्कादायक प्रकार असून त्याचा सामना करण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मोलकरीण संघटनेच्या डॉ. रूपा बोधी-कुळकर्णी यांनी या हल्लयाचा निषेध केला असून हल्ला कुणी केला हे उघड असल्याचे मत व्यक्त केले आहे. पानसरे यांनी कायम जातीयवादी, धर्माध व ब्राम्हणवादी शक्तींवर प्रहार केले. त्याच कट्टरपंथीयांचा या प्रकारात हात असण्याची शक्यता आहे. तशाच प्रकारच्या विचारांचा आधार लाभलेल्या राज्य सरकारकडून कारवाई होईल का, याबाबत शंकाच असल्याची टीका त्यांनी केली.
प्रगतिशील लेखक संघाचे महाराष्ट्राचे कार्यवाह श्रीपाद जोशी यांनी पानसरे हे विवेक, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता, कष्टकरी-श्रमिक, सामाजिक व सांस्कृतिक लढय़ाचे प्रतीक होते व त्यांच्यावरील हल्ला हा या प्रतीकावरील हल्ला असल्याचे सांगितले. परिवर्तनवादी व्यक्तींना नष्ट करण्याची चळवळ गेली अनेक दशके या देशात मूळ धरत आहे पण तिचा बंदोबस्त करण्याची इच्छाशक्ती कोणत्याच राज्य शासनात नाही. त्यामुळे अशा हल्लेखोरांचे मनोबल वाढले असल्याचे जोशी यांनी सांगितले.
सेवानिवृत्त सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी या घटनेचा निषेध केला असून अशा अतिरेकी कारवायांना राज्यघटनेत अजिबात स्थान नसल्याचे म्हटले आहे. संविधान न मानणाऱ्या लोकांनी हा हल्ला केला आहे. अशा वृत्तींचा निषेध करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कॉ. गोविंद पानसरे यांच्या झालेल्या हल्ल्याचा नागपुरात विविध संघटनांनी निषेध केला. डाव्या विचारांच्या कामगार संघटना, श्रमिक-मजुरांच्या संघटना, डावे राजकीय पक्ष तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते या निदर्शनात सहभागी झाले होते. संविधान चौकात ही निदर्शने करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा