ऊसदरासाठी सध्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यातील हजारो ऊसतोडणी कामगांरावर उपासमारीची वेळ आली आहे, याचा विसर आंदोलकांना पडला आहे. शिवाय आता कारखाने सुरू झाल्याने आंदोलनाची वेळ चुकीची आहे. साखरेलाच भाव नसेल तर उसाला कसा मिळणार, असा सवाल करून आंदोलकांनी साखरेच्या दरासाठी आंदोलन करण्याचा सल्ला साईकृपा साखर कारखान्याचे संचालक व युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला. पाचपुते म्हणाले, उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे हे आम्हालाही मान्य आहे. ऊस उत्पादनासाठी होणारा खर्च व साखरेचे दर पाहता उसाला जादा भाव देणे अडचणीचे ठरत आहे. साखरेचे भाव जागतिक बाजारपेठेवर ठरतात. पण तसे न करता शेतकऱ्यांच्या मागणी दरानुसार साखरेचा दर ठरवावा. साखर ४० रूपये भावाने खरेदी केल्यास कारखानाही उसाला चांगला भाव देईल, असे सांगून पाचपुते म्हणाले की, आंदोलनाची ही वेळ चुकीची आहे. आता कारखाने सुरू झाल्यावर आंदोलने होत असल्याने ऊसतोडणी मजूर, ऊसवाहतूकदार या सर्व हातावर पोट असणाऱ्यांच्या रोजीरोटीवर परिणाम होत आहे व याचा विसर आंदोलकांना पडत आहे. यावरील कोंडी फोडण्यासाठी सरकारने आता पुढाकार घेण्याची गरज आहे, अन्यथा दुष्काळाने आधीच पिचलेले शेतकरी, कामगार व कारखानदार पुन्हा संकटात सापडतील.    

Story img Loader