* मनसेच्या अजब धोरणामुळे सर्वसामान्य अचंबित
* ठाणे, नवी मुंबईतही सहमतीचे ‘राज’कारण
राज ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक केली म्हणून रस्त्यावर उतरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने शिमगा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी ठाण्यापासून अंबरनाथ-बदलापूपर्यंत जागोजागी सत्तेचा गोळा मटकविण्यासाठी राष्ट्रवादीसोबत केलेला संग बुधवारी येथील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. हजारो कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या ठाणे महापालिकेत शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवत स्थायी समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कळपात दखल झालेल्या मनसेने अंबरनाथ नगरपालिकेतही पाच सभापतीपदे राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पक्षाच्या मदतीने पटकावली आहेत. काँग्रेसने असहकार केला नसता तर ठाण्याच्या स्थायी समितीवर मनसेचा डोळा होता. असे असताना साहेबांच्या गाडीवर दगड पडला म्हणून शहरे बंद करणारे मनसेचे नेते राष्ट्रवादीच्या मदतीने मिळालेला सत्तेचा गोळा का सोडत नाहीत, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख नगरांमध्ये शिवसेनेचा वरचष्मा मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीसोबत केलेला दोस्ताना येथील राजकीय वर्तुळाला तसा नवा नाही. ठाण्याची महापौर निवडणूक होताच महापालिकेतील मनसेचे सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या लोकशाही विकास आघाडीच्या कळपात सहभागी झाले. महापालिकेच्या आर्थिक नाडय़ा स्थायी समितीकडे असतात. शिवसेनेच्या ठाण्यातील अर्थकारणाला सुरुंग लावण्यासाठी मनसेने राष्ट्रवादीच्या मदतीने सभापतीपद पदरात पाडून घेण्यासाठी कमालीचा आटापिटा केला. मात्र काँग्रेसने असहकार केल्याने मनसेला हा नाद सोडून द्यावा लागला. असे असले तरी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करत मनसेने शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविलाच. महापालिकेतील सत्तेच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत गळ्यात गळे घालून फिरणारे मनसे नगरसेवक मंगळवारी रात्री मात्र याच नेत्यांविरोधात घोषणा देत रस्त्यावर फिरत होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक करत शहरभर तणाव निर्माण करणारे मनसे कार्यकर्ते महापालिकेत राष्ट्रवादीची साथ सोडावी, असा दबाव आपल्या नेत्यांवर का आणत नाहीत, अशी चर्चाही यानिमित्ताने रंगली आहे.
राष्ट्रवादीच्या नावाने शिमगा करत अंबरनाथ, बदलापूर ही शहरे बंद पाडणाऱ्या मनसेने अंबरनाथ महापालिकेत राष्ट्रवादीच्या मदतीने पाच समित्यांची सभापतीपदे पटकावली आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ करत शिवसेनेला अस्मान दाखविण्याची तयारीही मनसेने केली होती. असे असताना साहेबांच्या गाडीवर दगड पडला म्हणून अंबरनाथ शहर बंद पाडण्याऐवजी राष्ट्रवादीच्या मदतीने नगरपालिकेत मिळालेल्या पदांचा मनसेचे पदाधिकारी राजीनामा का देत नाहीत, असा सवाल सर्वसामान्यांच्या मनात बुधवारी दिवसभर डोकावत होता. नवी मुंबईसारख्या शहरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांच्यासोबत सहमतीचे राजकारण करायचे. ऐन निवडणुकीपूर्वी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करायची आणि पुढे नव्या कार्यकारिणीची स्थापनाच करायची नाही असे राष्ट्रवादीधार्जीणे धोरण राबविणाऱ्या मनसेच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून राष्ट्रवादीच्या नावाने सर्वसामान्यांना वेठीस धरावे का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
रस्त्यावर राडा.. सत्तेत मात्र वाटेकरी !
* मनसेच्या अजब धोरणामुळे सर्वसामान्य अचंबित * ठाणे, नवी मुंबईतही सहमतीचे ‘राज’कारण राज ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक केली म्हणून रस्त्यावर उतरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने शिमगा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी ठाण्यापासून अंबरनाथ-बदलापूपर्यंत जागोजागी सत्तेचा गोळा मटकविण्यासाठी राष्ट्रवादीसोबत केलेला संग बुधवारी येथील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता.
First published on: 28-02-2013 at 12:14 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest on road sharecropper in politics