आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, गंगापूर रस्त्यावरील जेहान सर्कल ते गंगापूर गावापर्यतच्या टप्प्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता शेकडो झाडे तोडली जाणार असून त्यास नूरानी जामा मस्जिद, कब्रस्तान व दर्गा ट्रस्टने विरोध दर्शविला आहे. या रस्त्यावरील वृक्षतोड न थांबल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ट्रस्टने दिला आहे.
जेहान सर्कल ते गंगापूर गावापर्यंत मोठय़ा प्रमाणावर डेरेदार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. रस्त्यावर फारशी वाहतूक नसल्याने या ठिकाणी धावण्याच्या स्पर्धाचे आयोजन केले जाते. परिसरात वृक्षांची संख्या अधिक असल्याने उन्हाळ्यातही गारवा जाणवतो. अशा परिस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याचे कारण पुढे करत या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
या संदर्भात विस्तारीकरणात येणाऱ्या झाडांवर खुणा करून ते तोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. वास्तविक हा परिसर शांततामय असून झाडांची कत्तल झाल्यास रस्ता रुंद होईल मात्र मोटरसायकलवर ‘धुमस्टाईल’ वाहने दामटण्याचे प्रकार वाढणार असल्याची भीती ट्रस्टच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच, गंगापूर गावातील सव्‍‌र्हे क्रमांक ७३ मध्ये मुस्लिम बांधवांचे कब्रस्थान आहे. त्यातील कडुलिंब, वडाचे व इतर वृक्षांवर ते तोडण्याबाबत चिन्हांकीत करण्यात आले आहे. वास्तविक ही जागा ही सार्वजनिक वापराची असून ती महाराष्ट्र वक्फ बोर्ड यांच्याकडील ‘वक्फ’ मिळकत असल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध आहे. या जागेतील वृक्ष मोठय़ा स्वरूपाचे असून मुख्य रस्त्यापासून ते बऱ्यापैकी अंतरावर आहेत. तसेच सध्या अस्तित्वात असलेला रस्ता हा कब्रस्थानच्या जागेतून गेलेला असून यापुढे एक इंच जागा रस्त्यासाठी दिली जाणार नसल्याचे ट्रस्टने म्हटले आहे. प्रशासनाकडून कब्रस्थानास अद्याप दगडी संरक्षण भींत, निवारा शेड, पाणी, वीज व इतर सोयी सुविधा न देता जागा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या सर्व प्रक्रियेला ट्रस्टने विरोध दर्शविला आहे. ही प्रक्रिया न थांबल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मो. इरफान मणियार, मोसिन सिकंदर शेख आदींनी दिला आहे.

Story img Loader