सोमवारी गणेश बँकेत बैठक
अडचणीत आलेल्या पतसंस्था व बँकांमधून ठेवण्यात आलेल्या ठेवी व रक्कम काढता येत नसल्याने तसेच बँकांच्या गलथान कारभाराविरोधात संतप्त झालेल्या ठेवीदारांनी नाशिक जिल्हा बँक ठेवीदार हितवर्धक तथा बचाव समितीच्या झेंडय़ाखाली दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरल्यानंतर आता पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या अंतर्गत श्री गणेश सहकारी बँकेच्या कर्जबुडव्या कर्जदारांविरोधात आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी ९ डिसेंबर रोजी गणेश बँकेच्या अशोक स्तंभ शाखेत दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत बँकेचे संचालक, कर्मचारी तसेच बँक बचाव समितीचे सभासद व पदाधिकारी यांचे संयुक्त आंदोलन उभारण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सरचिटणीस अ‍ॅड. तानाजी जायभावे यांनी दिली आहे.
आपले हक्काचे पैसे परत मिळत नसल्याने ठेवीदार व सभासदांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या शासकीय कृती समितीच्या बैठकीत काही ठराव करण्यात आले. त्यामुळे आक्रमक झालेल्या ठेवीदार बचाव समितीने दबाव आणण्यासाठी गणेश बँकेत बैठकीचे आयोजन केले आहे. त्यासंदर्भातील माहितीच्या निवेदनात ठेवीदार बचाव समितीने आपली भूमिका मांडली आहे.
ठेवीदार बचाव समितीच्या शिष्टमंडळाने ६ मे रोजी गणेश बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. बँकेची कर्जवसुली होऊन ठेवीदारांची आर्थिक अडचण लवकरात लवकर दूर व्हावी अशी समितीची भूमिका होती व आजही असल्याचे अ‍ॅड. जायभावे यांनी म्हटले आहे.
समितीने सकारात्मक व विधायक भूमिका घेतली असताना बँकेकडून हेतुत: दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिवाय मार्च २०१३ अखेरीस बँकेच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात व महत्त्वाच्या मुद्दय़ांबाबत समितीने बँकेकडे माहिती मागितली होती. त्यासाठी समितीचे प्रतिनिधी अनेक वेळा तत्कालीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटले.
प्रत्येक वेळी दोन दिवसांत माहिती देण्याचे आश्वासन मिळत गेले. परंतु कोणीही अपेक्षित माहिती दिलीच नाही. ३० एप्रिलच्या समितीच्या पत्राची दखलही घेण्याची गरज बँकेला वाटली नाही. म्हणून बचाव समितीच्या ३० एप्रिलच्या पत्रातील शेवटच्या परिच्छेदात स्पष्ट केल्याप्रमाणे ठेवीदारांच्या हितासाठी व हक्कासाठी बचाव समितीला बँकेच्या कार्यालसमोर बँकेचे पदाधिकारी, संचालक, बडे थकबाकीदार यांच्या विरोधात शांततामय मार्गाने आंदोलन करणे आवश्यक झाले असल्याचे समितीने म्हटले आहे.
तरीही बँकेचे अध्यक्ष म्हणून शरद कोशिरे यांनी नव्याने पदभार स्वीकारल्यामुळे सर्व संचालकांसह त्यांना चर्चेची आणि त्यानुसार होणाऱ्या निर्णयाच्या कार्यवाहीची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ठेवीदार बचाव समितीने म्हटले आहे. त्यासंदर्भात नाशिक ठेवीदार हितसंवर्धन तथा बचाव समितीचे शिष्टमंडळ बँकेचे संचालक व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी सोमवारी चर्चा करण्यासाठी बँकेला भेट देणार असल्याचे कळविण्यात आले आहे. याच वेळी बँकेचे ठेवीदार शांततामय मार्गाने बँकेच्या कार्यालयासमोर धरणे धरतील. चर्चेच्या वेळी ३० एप्रिलच्या पत्रासोबतचे आर्थिक मुद्दय़ांसंदर्भातील आवश्यक माहिती बचाव समितीला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा