भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाकडे जमा असलेल्या सुमारे ३ अब्ज रुपयांच्या निधीपैकी जवळजवळ निम्मी, म्हणजे तब्बल दीड अब्ज रुपयांची रक्कम विनादावा जमा असल्याची माहिती मिळाली आहे.
कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होऊन जमा होणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (ईपीएफ) कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने मोठे महत्त्व असते. वेतनातून कर्मचाऱ्याचे अंशदान अनिवार्य रूपाने जमा केले जात असल्यामुळे त्याची बचत सतत वाढत जाते. घर बांधणे, मुलीचे लग्न, शस्त्रक्रिया किंवा तत्सम कारणांसाठी काही कर्मचारी यातील रक्कम काढत असले, तरी हा निधी म्हणजे प्रामुख्याने सेवानिवृत्तीनंतरची सोय असल्याने पीएफला हात न लावण्याची बहुतांश कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती असते. खाजगी कार्यालये, सहकारी बँका आणि सहकारी संस्था यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होऊन जमा होणाऱ्या भविष्य निर्वाह निधीचे काम भारत सरकारच्या कामगार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या कर्मचारी भविष्य निधी संघटनेमार्फत केले जाते.
या संघटनेच्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारित नागपूर, अकोला व औरंगाबाद येथील विभागीय कार्यालये येतात. साहजिकच त्याचा व्याप बराच मोठा आहे. मार्च २०१२ अखेपर्यंत या कार्यालयाकडे भविष्य निर्वाह निधीची ३ अब्ज ८ कोटी ५ लाख १२ हजार ६२७ रुपये इतकी रक्कम जमा होती. कार्यालयाचे कार्यक्षेत्र पाहता ही रक्कम कदाचित प्रचंड म्हणता येणार नाही.
परंतु केवळ नागपूरच्या प्रादेशिक कार्यालयातच एवढी रक्कम जमा होत असेल, तर देशभरात कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडे किती रक्कम गोळा होत असेल याचा अंदाज करणेही कठीण आहे.
मात्र नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कर्मचाऱ्यांची जेवढी खाती आहेत, त्यापैकी मार्च २०१२ अखेपर्यंत ८ लाख १५ हजार ७६४ खाती विना दावा (अनक्लेम्ड) असून, त्यातील कुणीही अद्याप दावा न केलेली रक्कम तब्बल १ अब्ज ४५ कोटी २ लाख ३० हजार ४६९ रुपये इतकी आहे! कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या पीएफचा दावा निकालात काढण्यासाठी ३० दिवसांची मुदत असल्याचे या कार्यालयानेच सांगितले आहे.
लाखो कर्मचाऱ्यांनी आपली पीएफची रक्कम काढण्यासाठी दावाच केलेला नाही, असा याचा अर्थ निघतो.
कर्मचाऱ्यांच्या हक्काची एवढी मोठी रक्कम त्यांना परत करण्यासाठी हे कार्यालय स्वत:हून काय प्रयत्न करते, हे कळायला मात्र मार्ग नाही.
१ ऑक्टोबर २०१० ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधीचे ३ लाख ३८ हजार दावे निकालात काढण्यात येऊन त्यापोटी ८९१२९.२४ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली.
१ लाख १० हजार दावे परत पाठवण्यात आले असून १२ हजार ७१५ दावे प्रलंबित आहेत, असेही अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाच्या उत्तरात ईपीएफओच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाने कळवले आहे. याच कालावधीत १८ हजार ८४० प्रकरणांमध्ये आगाऊ रक्कम (अ‍ॅडव्हान्स) मंजूर करण्यात येऊन त्यासाठी १३२०९.७९ लाख इतकी रक्कम अदा करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम खाजगी क्षेत्रात गुंतवण्याचा विषय सध्या चर्चेत आहे. अशी किती रक्कम व कुठल्या निकषांवर गुंतवण्यात आली, या प्रश्नावर, याबाबतचे धोरण मुख्य कार्यालय ठरवत असल्याने नागपूरशी संबंधित माहिती उपलब्ध नसल्याचे या कार्यालयाच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ३१ मार्च २०१२ अखेर पीएफची किती रक्कम सहकारी बँका, सहकारी संस्था व खाजगी कंपन्या यांच्याकडे थकित होती, हीदेखील माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी कळवले आहे.