सन २०१३-१४ या वर्षांसाठी कोल्हापूर महापालिकेची ३०९ कोटी ८७ लाख भांडवली जमा, ३०९ कोटी ७ लाख रूपये खर्चाचे व ८० लाख १३ हजार शिलकीचे अंदाजपत्रक सोमवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी स्थायी समितीकडे सादर केले. विशेष प्रकल्पासाठी ४४५ कोटी १३ लाख रूपये इतकी महसुली जमा अपेक्षित आहे, तर ३८७ कोटी ७४ लाख रूपये खर्च केले जाणार आहेत. बहुचर्चित थेट पाईपलाईन योजनेसाठी ६० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.    
स्थायी समितीचे सन २०१२-१३ चे सुधारित व २०१३-१४ चे नवीन अंदाजपत्रक आयुक्त बिदरी यांनी सादर केले. त्यांनी ते स्थायी समिती सभापती राजू लाटकर यांच्याकडे सुपूर्त केले. अर्थसंकल्पातील प्रमुख विकासकामांची माहिती देतांना त्या म्हणाल्या,‘‘ कोल्हापूर शहरासाठी काळम्मावाडी योजनेतून थेटपाईप लाईन योजना केली जाणार आहे. ३४२ कोटी रूपये खर्चाच्या योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. ही योजना युआयडीएसएसएमटी या केंद्र शासनाच्या योजनेतून पूर्ण केली जाणार असून त्यासाठी केंद्राकडे राज्य शासनाने प्रस्ताव पाठविला आहे. योजनेचा १० टक्के हिस्सा महापालिकेने खर्च करायचा असून त्यासाठी ६० कोटी रूपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.’’    
कोल्हापूर शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महालक्ष्मी मंदिर परिसर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तो १९० कोटी खर्चाचा आहे. याशिवाय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वाखाली बहुमजली मोटार पार्किंग सुविधा उभारली जाणार आहे. स्टॉर्म वॉटर प्रकल्पासाठी ७५ कोटी ५५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली असून हे काम प्रगतिपथावर आहे. नगरोत्थान रस्ते प्रकल्पाचे १०८ कोटी रूपयांचे काम मंजूर असून त्याला गती दिली जाणार आहे.    
पंचगंगा नदी प्रदूषणाकडे विशेष लक्ष पुरविले जाणार आहे, असा उल्लेख करून बिदरी म्हणाल्या, हे काम १०८ कोटी रूपये खर्चाचे असून त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यातील २४ दशलक्ष क्षमतेचा जलशुध्दीकरणाचा पहिला टप्पा २४ एप्रिलपर्यंत पूर्ण केला जाणार आहे. उर्वरित कामे बार चार्टनुसार पूर्ण केली जाणार आहेत.योजनेसाठी आवश्यक तो निधी प्राप्त करण्यासाठी नियोजन केले आहे. याशिवाय राजीव आवास योजनेंतर्गत अधिकृत झोपडपट्टीवासीयांना घरकुले, बांधा वापरा तत्त्वावर महापालिकेच्या जागा विकसित करणे, शौचालय बांधणे यासाठी निधीची तरतूद केली आहे.