सोयगाव भागात प्रविण महारू पाटील(२४) या तरूणाने तीन दिवसांपूर्वी केलेली आत्महत्या ही नोकरीच्या लालसेने दिलेले पैसे परत मिळत नाही आणि नोकरीही मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी येथील माजी नगराध्यक्ष दीपक भोसले यांच्याविरोधात कॅम्प पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविणने सोयगावातील आनंद सागर कॉलनीतील आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती.
आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. दीपक भोसले यांनी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नऊ लाख ५० हजार रूपये घेतले. हे पैसे उभे करताना आपण कर्जबाजारी झालो. बराच काळ लोटूनही नोकरी लागत नसल्याने पैसे परत मागण्यासाठी तगादा सुरू केला. मात्र वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे आपण आत्महत्या करीत असून त्यासाठी भोसले हेच जबाबदार आहेत, अशा आशयाचा मजकुर चिठ्ठीत नमुद करण्यात आला आहे.
प्रविण हा भोसले यांचा नातेवाईक आहे. तसेच त्यांच्या हॉटेलमध्ये काही काळ तो कामासही होता. प्रविणचे वडिल महारू दयाराम पाटील (रा. कन्नड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. संशयित भोसले हे फरार असल्याचे पोलिस निरिक्षक विजय जाधव यांनी सांगितले.

Story img Loader