एसटीखाली अनेकांना चिरडणारा बसचालक संतोष माने हा १९ फेब्रुवारी २०१० ते ३ नोव्हेंबर २०११ या काळात मानसिक उपचार घेत होता. या काळात त्याला सहा शॉक दिण्यात आले, असी साक्ष सोलापूर येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दिलीप बुरटे यांनी मंगळवारी न्यायालयात दिली.
संतोष माने खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांच्या न्यायालयात सुरू आहे. त्यात मंगळवारी बुरटे आणि मेडिकल स्टोअरचा चालक शिवानंद शेटे यांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वला पवार या, तर बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. धनंजय माने, अ‍ॅड. ऋषिकेश गानू आणि अ‍ॅड. प्रदीप पवार हे काम पाहत आहेत.
डॉ. बुरटे हे १९७७ पासून सोलापूर येथे मानसोपचारतज्ज्ञ म्हणून व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे माने हा १९ फेब्रुवारी २०१० रोजी पहिल्यांदा उपचारासाठी त्यांच्याकडे गेला. ‘झोप न लागणे, कमी जेवण, चिडचिड, आनंदी नसणे, संशयी वृत्ती, हृदय धडधडणे, कानात आवाज येणे ही मानसिक आजाराची लक्षणे त्याला होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी माझ्याकडे आणण्यात आले. त्यानुसार त्याची वेळोवेळी तपासणी करून त्याच्यावर औषधोपचार केले. १९ फेब्रुवारी २०१० ते १२ मार्च २०१० या काळात त्याला सहा वेळा शॉकही दिले. माने यास उपचारास आणले त्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर त्याच्या मनात आत्महत्येचाही विचार आला होता. तसेच त्याला तंबाखूचे व्यसन होते. तो क्वचित दारूही पीत असे,’ असे डॉ. बुरटे यांनी न्यायालयात सांगितले. या खटल्याची आता सुनावणी १ मार्च रोजी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा