आपल्या बहारदार आवाजाने रसिकांच्या मनात घर करणारा एखादा गायक मोठय़ा पडद्यावर वेगळ्याच गायकाच्या आवाजात गाताना दिसला, तर रसिकांची काय प्रतिक्रिया होईल? या प्रश्नाच्या उत्तरासाठी फार काळ थांबायला लागणार नसून २९ मार्च रोजी रसिकांची प्रतिक्रिया कळणार आहे, कारण ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटातील एकमेव गाण्याच्या निमित्ताने एक वेगळाच योग जुळून आला आहे.
हे गाणे पं. चंद्रकांत लिमये यांच्यावर चित्रित झाले आहे. मात्र या गाण्यात पंडितजींचा आवाज नसून सध्या शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावर तळपत असलेल्या जयतीर्थ मेवुंडी यांनी पंडितजींना उसना आवाज दिला आहे. ठुमरी अंगाच्या या गाण्याचे संगीत अशोक पत्की यांनी दिले आहे. पट्टीच्या गायकासाठी तेवढय़ाच तोडीच्या गायकाने पाश्र्वगायन करण्याची ही बहुधा दुसरीच खेप असावी. याआधी किशोरकुमार यांच्यासाठी मोहम्मद रफी यांनी काही गाणी गायली आहेत. ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटात एकच गाणे असल्याचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपल्याला सांगितले. एका मंत्र्याच्या घरी इतर नेतेमंडळी जमली आहेत आणि त्या वेळी चाललेल्या मैफलीतील हे गाणे आहे. त्यामुळे आपल्याला खास शास्त्रीय ढंगातील गाणेच हवे होते, असे अशोक पत्की यांनी ‘रविवार वृत्तांत’शी बोलताना सांगितले.हे गाणे पं. चंद्रकांत लिमये यांच्यावर चित्रित होणार असल्याचे चंद्रकांत कुलकर्णी यांनी पत्की यांना सांगितले होते. मात्र पंडितजींवर छोटीशी शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना आपल्या गायनाबाबत साशंकता होती. मग पंडितजींना शोभेल असा पाश्र्वगायक कोणता, याचा शोध सुरू झाला. त्यातच या गाण्यासाठी ठुमरी अंगाचे शब्द दासू वैद्य यांनी लिहिल्यानंतर आपल्या डोक्यात जयतीर्थ मेवुंडी यांचेच नाव आले. सुदैवाने त्यांनीही होकार दिल्यानंतर अवघ्या साडेतीन तासांत गाणे ध्वनिमुद्रित झाले, असेही पत्की म्हणाले. हे गाणे कोणत्याही ट्रॅकवर ध्वनिमुद्रित न करता प्रत्यक्ष सर्व वाद्यांसह ध्वनिमुद्रित केले. अशोक पत्कींसह ध्वनिमुद्रण करण्याचा अनुभव खूपच मस्त होता, असे जयतीर्थ मेवुंडी यांनी सांगितले. शास्त्रीय संगीतात मुरलेल्या गायकांनी चित्रपटासाठी गाणी गायला हवीत. त्यामुळे आम्हाला प्रसिद्धी मिळते, वेगळ्या गोष्टी शिकता येतात आणि आमचे शास्त्रीय संगीत ऐकायला लोकही येतात. सुगम संगीत गाणेही खूप कठीण आहे, हे यानिमित्ताने आपल्याला कळले, कारण तीन तासांच्या मैफलीचा आवाका आपल्याला तीन मिनिटांच्या गाण्यात बसवण्याचे कसब शिकायला मिळाल्याचे मेवुंडी यांनी स्पष्ट केले.
पं.चंद्रकात लिमये गाणार जयतीर्थ मेवुंडी यांच्या आवाजात
आपल्या बहारदार आवाजाने रसिकांच्या मनात घर करणारा एखादा गायक मोठय़ा पडद्यावर वेगळ्याच गायकाच्या आवाजात गाताना दिसला, तर रसिकांची काय प्रतिक्रिया होईल? या प्रश्नाच्या उत्तरासाठी फार काळ थांबायला लागणार नसून २९ मार्च रोजी रसिकांची प्रतिक्रिया कळणार आहे.
First published on: 10-03-2013 at 12:33 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pt chandrakant limaye will sing jaytirth mevundi voice