शहरात नगर परिषदेची तसेच वीज वितरण कंपनीची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे विविध कंपन्यांनी  उभारलेल्या मोबाईल टॉवर विरोधात तसेच पालिकेच्या पदाधिकारी-अधिकाऱ्यांची या उभारणीला ‘फूस’ असण्याच्या विरोधात नागरिकांनी प्रखर विरोध दर्शवित, नगर परिषदेने त्वरित कार्यवाही करून नागरिकांना तसेच पशु, पक्षी, प्राणी जीवांना ‘रेडिएशन’च्या अपायापासून मुक्त करावे, अशी मागणी केली आहे. खातरोड परिसरातील अनेक महिला व पुरुषांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी कार्यालयात धडक दिली व अनधिकृतपणे उभारलेल्या व उभारत असलेल्या टॉवर विरोधात निषेध व्यक्त केला. तसेच पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविली.
नगर परिषद मुख्याधिकारी  निपाने यांच्याशी या गंभीर विषयावर चर्चा करणाऱ्यात छाया कावळे, श्रद्धा पांडे, वंदना ढबाळे, अनिता भेले या महिला प्रतिनिधी तर सुरेंद्र पांडे, लक्ष्मण भेंडारकर, नितीन मलेवार, अनिल गायधने, नगरसेवक व्यास, उत्तम भेले, बालू खरवडे हा पुरुष प्रतिनिधी वर्ग होता. सदर अनधिकृत कामे बंद करावीत अन्यथा जनआंदोलन करू, असा इशाराही याप्रसंगी देण्यात आला.  मुख्याधिकारी निपाने यांनी याप्रसंगी मोबाईल टॉवर उभारणीकरिता नगर परिषदेची परवानगी घेण्यात आली नाही, असे सांगत होत असलेले काम बंद करण्याची कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शिवाय नगर परिषद अभियंता रवी भवरे व आनंद मिश्रा यांनी घटनास्थळी जाऊन एका ठिकाणचे काम बंदही केले. अन्य ठिकाणीही अशीच कार्यवाही करा, असे बजावित मोर्चा परतला.