शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या रोगांचे वाढते प्रमाण बघता त्याला आळा घालण्यासाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात शहरातील विविध शाळा महाविद्यालयांसह विविध भागांत आरोग्य विभागातर्फे पाच लाख पत्रके वाटून जनजागृती करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची महापौर अनिल सोले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. शहरात गेल्या दोन महिन्यांत डेंग्यूचे चार रुग्ण आढळून आले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. घरोघरी डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या रुग्णांची संख्या वाढत असताना हा प्रकोप रोखण्यासाठी झोननिहाय १० कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक झोनमध्ये फवारणी करण्यासाठी १० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रत्येक वस्तीमध्ये फवारणी करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. पावसाळ्यात रोगांपासून जनतेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने सप्टेंबर महिन्याचा एक दिवस कोरडा दिवस पाळावा, त्यादृष्टीने आरोग्य विभागाने तसा कार्यक्रम ठरवून जनतेमध्ये जागृती करावी, यामुळे कीटकजन्य व साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यात मदत होईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.
शहरातील विविध भागांत होर्डिंग्ज आणि बॅनर लावून जागृती करावी. शहरातील विविध भागांतील झोपडपट्टीबहुल भागांत आरोग्य शिबीर आयोजित करण्याचे निर्देश सोले यांनी दिले. बैठकीला उपमहापौर जैतुनबी अंसारी,आरोग्य सभापती रमेश सिंगारे, रश्मी फडणवीस, रामदास गुडधे, विद्या कन्हेरे, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक उरकुडे, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री धोटे आदी उपस्थित होते.
गेल्या महिन्याभरात जिल्ह्य़ात डेंग्यू, मलेरिया आणि इतर ४६ साथीचे रुग्ण आढळून आले असताना आरोग्य आणि स्वच्छतेबाबत ग्रामसेवक किंवा जिल्हापरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पावसाळ्याच्या दिवसात दिरंगाई केली तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष आणि आरोग्य समितीचे सभापती चंद्रशेखर चिखले यांनी दिला.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाळ्यात खड्डे, डबक्यांमध्ये पाणी साचून राहणे आदी प्रकार घडतात. डबक्यांमध्ये साचलेल्या गढूळ पाण्यात मच्छरांचा वावर असतो. या मच्छरांमुळे साथीचे आजार होतात. यावर्षी जिल्ह्य़ात ४६ साथीचे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर औषधोपचार सुरू असून गावात त्यावर उपाययोजना करण्यात येत आहेत. साथरोग नियंत्रणासाठी तालुका आणि आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी चांगले काम करीत असले तरी काही वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत तक्रारीदेखील आल्या आहेत. या तक्रारीविषयी अधिक माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे चिखले यांनी सांगितले. गावोगावी घरासमोर, घराच्या बाजूला लहान मोठे गढूळ पाण्याची डबकी असतात. पावसाळ्यात या डबक्यांमध्ये डासांचा प्रकोप वाढतो. परिणामी साथीचे आजार होत असतात. त्यामुळे घराच्या आजूबाजूला पाण्याचे डबके असेल किंवा अस्वच्छता असेल तर ग्रामसेवकांकडे जाऊन तक्रार करा आणि ग्रामसेवक दखल घेत नसेल तर वरिष्ठ आरोग्य अधिकारी किंवा आरोग्य सभापतीकडे तक्रार करावी. ग्रामसेवक काम करीत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा चिखले यांनी दिला. ज्या प्लॉटमध्ये पाणी जमा होत असेल तर त्वरित संबंधित प्लॉटधारकाला एकतर बांधकाम करा किंवा पाणी जमा होऊ देऊ नका अशी नोटीस देण्याचे आदेश ग्रामसेवकाला देण्यात आले असल्याचे चिखले यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा