ग्रामीण भागात दुष्काळाचे चटके सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत. शहरातही पाणीटंचाई जाणवेल, या पाश्र्वभूमीवर काही राजकीय पक्षांनी जाणीवजागृतीचे झेंडे उंचावण्यास सुरुवात केली आहे. नव्यानेच स्थापन आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गळती थांबविण्यासाठी होणाऱ्या जाणीवजागृतीच्या फेरीत ‘चार-पाच’ प्लंबरनाही बरोबर घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पाणी वाचवा, पाणी पुरवा या आशयाचे पत्रक थेट गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित केले. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर सदस्यता नोंदणीचाही धडाका सुरू आहे.
औरंगाबाद शहराला पिण्याच्या पाण्याचा तसा फारसा तुटवडा जाणवणार नाही. जुलै महिन्यात काहीअंशी पाणीटंचाई तीव्र होऊ शकते, असे अधिकारी सांगतात. ‘पाणी जपून वापरा’ हा संदेश प्रत्येकजण आपापल्या पातळीवर देत आहे. राजकीय पक्षात तर हा संदेश देण्याची जणू चढाओढ लागली आहे. आम आदमी पार्टीने जाणीव जागृतीसाठी विशेष अभियान सुरू केले असून, घरातील आणि परिसरातील गळती थांबविण्यासाठी या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. एकेका भागात जाऊन पाणी वापराचे महत्त्व सांगणारी पत्रके कार्यकर्ते वाटत आहेत. एखाद्याच्या घरात पाणी गळती होत असल्यास नळ दुरुस्तीची छोटी कामे तातडीने दुरुस्त करून दिली जातात.  या निमित्ताने या नव्या पक्षाची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद पाटील यांनी पाणी वापरण्याचे १२ संदेश देण्यासाठी ५० हजार पत्रके प्रकाशित केली आहेत. पाणी कसे वापरावे, कसे ठेवावे याचे मार्गदर्शन या पत्रकांमधून करण्यात आले आहे. राष्ट्रवादीने पत्रकावर आवर्जून निवडणूक चिन्ह छापले आहे, तर आम आदमी पार्टीने त्यांचे चिन्ह पत्रकावर प्रकाशित केले आहे. या अनुषंगाने बोलताना आम आदमी पार्टीचे दुष्यंत दुसाने म्हणाले, दुष्काळ असल्याने पाणी वाचवा हे जनजागृतीचे अभियान सुरू केले आहे. त्याला प्रतिसादही मिळतो आहे. संपर्क वाढतो, हे खरे आहे. काही लोक नंतर कार्यालयात आवर्जून भेटून जातात.

Story img Loader