महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सामोपचाराने तंटे मिटविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह प्रशासकीय पातळीवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून सहकार्य मिळत आहे. राष्ट्रीय व विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती यांच्या समन्वयाने सुरू असलेल्या लोक न्यायालयांच्या माध्यमातून आजवर हजारो खटले तडजोडीने सोडविण्यात यश आले आहे. नुकतेच नाशिक विभागात झालेल्या राष्ट्रीय महालोक अदालतीमध्ये ७००१ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, हा उपक्रम तंटामुक्तीचे यश अधोरेखित करते.
या मोहिमेत महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणासह, जिल्हा तसेच तालुकापातळीवर विधी सेवा समितीचे तंटा मिटवण्यासाठी सहकार्य कशा पद्धतीने घ्यावे याबाबत शासनाकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना व कार्यवाहीची पद्धत निश्चित करीत प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. यामध्ये दिवाणी, महसुली व इतर प्रलंबित दाव्यात तडजोड झाल्यानंतर उभय पक्षकारांच्या स्वाक्षरीने न्यायालयात वा सक्षम प्राधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त करून घेण्याची एक पद्धत आहे. लोक न्यायालयाचा हुकूमनामा प्राप्त झाल्यानंतर त्याची सत्यप्रत अभिलेखांवर घेऊन त्याद्वारे तंटा मिटला असे समजले जाते. तंटामुक्त गाव मोहिमेत लोकन्यायालयाचा तंटे मिटविण्यासाठी सहभाग घेतल्यामुळे ही प्रक्रिया गतिमान झाल्याचे दिसून येते. वास्तविक, विधी सेवा प्राधिकरण कायद्यान्वये राज्य प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जिल्हा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समितीला योग्य वाटेल अशा कालांतराने व ठिकाणी लोक न्यायालय आयोजित करण्यात येते. यात न्यायालयात दाखल करण्यात न आलेले प्रकरण तडजोडीने मिटविण्यावर भर दिला जातो.
विविध न्यायालयांत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी नाशिक येथे महालोक अदालत घेण्यात आली. प्रत्येक न्यायालयासाठी स्वतंत्र पॅनल ठरविण्यात आले. या महालोक अदालतीत विविध प्रकारातील ७००१ प्रकरणे निकाली काढण्यात आले. तडजोडीअंती जिल्ह्य़ातील ३९४१ प्रकरणे निकाली निघाली. त्यात प्राधिकरण कार्यालयातील ३६८ पैकी ६४८ प्रकरणांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविले जात आहे. या मोहिमेचे यंदाचे सातवे वर्ष. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या मोहिमेच्या नाशिक विभागातील कामगिरीचा वेध लेख मालिकेद्वारे घेण्यात येत आहे. मालिकेतील हा तिसरा लेख.
तंटामुक्त मोहिमेस लोक अदालतीचा हातभार
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सामोपचाराने तंटे मिटविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह प्रशासकीय पातळीवर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-11-2013 at 09:04 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public court helps out tanta mukti gaon campaigning