सध्या दहावीची परीक्षा सुरू झाली असून अनेक केंद्रांजवळून अवजड वाहने जात असल्याने परीक्षेच्या कालावधीत शहरातून अवजड वाहनांना बंदी करणे तसेच परीक्षा केंद्रांजवळ वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी मनसे वाहतूक सेनेतर्फे करण्यात आली आहे.
दहावीची परीक्षा सुमारे महिनाभर चालणार असून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांबरोबर त्यांना ने-आण करण्यासाठी पालकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे. शहरातील अनेक परीक्षा केंद्र हे मध्य वस्तीत असून अनेक केंद्रांवर वाहनतळ वा इतर सुविधांची वानवा आहे. त्यामुळे अशा केंद्रांजवळ परीक्षेच्या कालावधीत वाहतुकीवर प्रचंड ताण पडलेला दिसून येतो. अलिकडेच शहरात घडलेल्या एका अपघातात दहावीतील दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. अशा प्रकारची घटना दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या व आधीच परीक्षेचा ताण असलेल्या विद्यार्थ्यांबाबत घडू नये यासाठी प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतल्याचे दिसत नाही. या पाश्र्वभूमीवर परीक्षेच्या कालावधी दरम्यान शहराच्या हद्दीत अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी टाकावी. तसेच सर्व परीक्षा केंद्रावर खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने परीक्षेच्या वेळेत वाहतूक पोलिसांची नेमणूक करून विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही दिलासा द्यावा असी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस उपायुक्तांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष शाम शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख शेख वाहिद यांची स्वाक्षरी आहे.

Story img Loader