लोकलची गर्दी चुकवून मुंबईकडे जाण्यासाठी ‘बेस्ट’चा पर्याय स्वीकारणाऱ्या हजारो ठाणेकर प्रवाशांना मंगळवारी थांब्यावर खोळंबून रहावे लागले. अचानक झालेल्या संपामुळे काही मोजके अपवाद वगळता ठाण्यात बेस्टच्या बसेस फिरकल्याच नाहीत. कॅडबरी नाक्यावरून मुंबईतील बोरिवली, दादरच्या दिशेने वातानुकूलित बसने प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांची गर्दी या थांब्यावर झाल्याचे चित्र दिसत होते. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून बोरिवली, गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या बसेसही आगारात आल्या नाहीत. त्यामुळे गर्दीने तुडुंब वाहणारी लोकल पकडावी लागल्याने प्रवाशांचे हाल झाले.
संपामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत ठाण्यात येणारी एकही बेस्ट बस धावली नाही. त्यामुळे प्रवाशांना लोकलच्या गर्दीचा तर काहींना रिक्षा वाहतुकीचा पर्याय अवलंबावा लागला. अचानक झालेल्या या संपाचा फटका ठाणे-मुंबई-ठाणे असा प्रवास करणाऱ्या सुमारे तीस हजार प्रवाशांना सहन करावा लागल्याचा अंदाज आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या नाकर्तेपणामुळे हैराण झालेल्या ठाणेकर प्रवाशांना बेस्टची सेवा दिलासादायक ठरली आहे. ठाण्यातील अंतर्गत वाहतुकीपेक्षा बेस्टने महामार्गावरून मुंबई-ठाणे मार्गावर वेगवेगळ्या सेवा सुरू केल्या आहेत. वर्तकनगर येथील कॅडबरी कंपनीपासून मुंबईच्या दिशेने सोडण्यात येणाऱ्या वातानुकूलित बससेवेला प्रवाशांची मोठी मागणी असते. तीनहात नाका, लोकमान्य नगर, नौपाडा या भागामध्ये सुरू असलेल्या बेस्ट सेवेचा चांगला फायदा प्रवाशांना होतो. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे सहा लाख प्रवाशांची ये-जा असते. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने बेस्टचा पर्याय काहीसा खर्चीक असला तरी ठाणेकरांनी तो स्वीकारला आहे. लोकलच्या गर्दीतून प्रवास करण्यापेक्षा बेस्टच्या प्रवासाला पसंती देणाऱ्या प्रवाशांचा आकडा बराच मोठा आहे. २० मिनिटांच्या अंतराने येणाऱ्या गाडय़ांमुळे ही सेवा ठाणेकरांना हवीहवीशी वाटू लागली आहे. मुंबईतील देवनार, मजास, मुलुंडपासून, अंधेरी, बांद्रा या भागांमध्ये जाणे बेस्ट बसेसमुळे प्रवाशांना सोईचे जाते. ठाण्याच्या पश्चिमेकडील बाजूस राहाणाऱ्या प्रवाशांसाठी बेस्टची सुविधा उपयोगी ठरली आहे. तसेच घोडबंदर भागात नव्याने उभ्या राहिलेल्या गृहसंकुलातील प्रवाशांना बोरिवली, कांदिवली यासारख्या मुंबईतील पश्चिम उपनगरांकडे जाण्यासाठी बेस्ट सेवा महत्त्वाची ठरली आहे. बेस्टच्या ठाण्यातून होणाऱ्या वाहतूक मार्गावर नेहमीच गर्दी असून या मार्गावरून दिवसाला तीस हजारांच्या आसपास प्रवासी या वाहतूक सेवेचा फायदा घेतात. मंगळवारच्या संपाने या प्रवाशांना मोठय़ा गैरसोयीचा सामना करावा लागला. बेस्टच्या बसेस थांब्यांवर नसल्याने कामावर निघालेल्या नागरिकांना लोकलच्या दिशेने धाव घ्यावी लागली. ज्याची त्याची पावले रेल्वे स्थानकाच्या दिशेने वळू लागल्याने रिक्षा चालकांनाही जोर चढला. कॅडबरी नाक्यावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे लक्षात येताच काही रिक्षा चालकांनी आपला मोर्चा या नाक्याच्या दिशेने वळविला. तेथून रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी मन मानेल त्या पद्धतीने भाडय़ाची मागणी प्रवाशांकडून केली जात होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा