वादळ वा तुफानाचा एक नियम असतो. एकदा उठल्यानंतर ते कालांतराने पुन्हा शांत होते. आम आदमी पक्षाचा वर्षभरापूर्वी असणारा झंझावात या स्वरूपाचा होता. दिल्लीत निवडणुकीपूर्वी दुर्लक्ष करणाऱ्या प्रसारमाध्यमांना निवडणुकीनंतर पक्षाचे महत्त्व लक्षात आले. दिल्लीत सरकार स्थापन करताना सर्वसामान्यांचे म्हणणे विचारात घेण्यात आले होते; परंतु राजीनामा देताना मात्र तसे मत विचारात घेतले गेले नाही. हा चुकीचा अपवाद वगळता आपची जिथून सुरुवात झाली होती, त्या बिंदूपासून पक्ष आज वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे, असे मत पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले. नाशिक लोकसभा मतदार संघातील आपचे उमेदवार विजय पांढरे यांच्या प्रचारार्थ सोमवारी यादव यांच्या उपस्थितीत शहरात फेरी काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर उमेदवार उभे करण्यात पक्ष यशस्वी झाला आहे. महाराष्ट्र ही जनआंदोलनांची भूमी आहे. देशपातळीवरील अनेक आंदोलनांना या भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आप पुढील विधानसभा निवडणुकीची तयारी करत असून नागरिकांना एक सक्षम पर्याय या माध्यमातून उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळतील हे मात्र सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले. आपच्या नेत्यांवर सातत्याने हल्ले होत असल्याच्या प्रश्नावर यादव यांनी भाजप व काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे आपचा कोणताही नेता पोलीस संरक्षण घेत नसल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी यांना झेड दर्जाची सुरक्षाव्यवस्था असते. सर्वसामान्य नागरिक त्यांना प्रत्यक्ष भेटूही शकत नसल्याचा दावा त्यांनी केला. आपच्या उमेदवारांना निधीची चणचण भासत असल्याचे त्यांनी मान्य केले. पक्षाकडे उमेदवारांना देण्यासाठी फारसा निधी नाही. स्थानिक पातळीवर पक्षाकडे संकलित झालेला निधी त्यांच्याकडून वापरला जातो. इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांवर जाहिरात देण्याची पक्षाची आर्थिक क्षमता नाही. यामुळे पक्षाचे नेते प्रचारात सक्रिय झाले असून ती उणीव प्रचाराद्वारे भरून काढली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्थानिक मुद्दे मांडले जात आहेत, परंतु खासदार, आमदार वा स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी नेमके काय काम करतात याबद्दल मतदार अनभिज्ञ असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे यादव यांनी नमूद केले.

Story img Loader