सिंगापूर व मलेशियातील नागरिक व लोकप्रतिनिधींनी शिस्तबद्ध आचारसंहिता स्वत:साठी घालून घेतल्याने तेथील विकास झपाटय़ाने झाला. त्याच धर्तीवर आपल्याही लोकप्रतिनिधींनी सत्तेचा व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अधिकाराचा उपयोग विकासासाठी केल्यास देशाचा विकास होईल, असा आशावाद माजी महापौर प्रकाश मते यांनी व्यक्त केला.
दीपावलीच्या निमित्ताने दक्षता अभियानतर्फे प्रसिद्ध कवी नंदन रहाणे यांचे ‘दीपावलीचे आनंदपर्व व मराठी शेरोशायरी’ या विषयावर आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मते बोलत होते. निवडून आल्यानंतर कोणत्याही घटनेकडे राजकारण म्हणून न बघता सर्वागीण कामे करावीत. नागरिक त्यांची जाणीव ठेवतात. नागरिकांनीही लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करून घेण्यासाठी सतर्क असले पाहिजे, अशी सूचनाही प्रकाश मते यांनी केली. या वेळी कवी नंदन रहाणे यांनी दिवाळीची महती सांगतानाच समाजप्रबोधनपर कविता सादर केल्या. प्रास्ताविकात नगरसेवक विक्रांत मते यांनी वडिलांनी रस्त्यावरील कचरा उचलण्याची घंटागाडी सुरू केली तर, आपण गोदावरी स्वच्छतेसाठी पाण्यावरील घंटागाडी निर्माल्य संकलन बोट सुरू केल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. सोपान एरंडे यांनी केले. आभार तुषार ठाकरे यांनी मानले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक त्र्यंबकराव गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार पां. भा. करंजकर व्यासपीठावर उपस्थित होते.

Story img Loader