मॅजिक, इकोव्हॅनला पनवेलदरम्यान थांब्यांची मागणी
 बेलापूर ते कळंबोली हायवे या पल्ल्यावर चालणाऱ्या इकोव्हॅन आणि मॅजिक रिक्षांसाठी वाहतूक विभागाने कायदेशीर थांबे द्यावेत यासाठी राष्ट्रीय पक्षाचे पनवेलचे लोकप्रतिनिधी वाहतूक पोलिसांच्या दरबारी प्रयत्न करीत आहेत. या बेकायदा वाहतुकीचा फटका एनएमएमटी प्रशासनाला बसला आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांत अचानक वाढलेली ही बेकायदा वाहने अधिकृत करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासन दरबारी हट्ट धरला आहे.
वाहतूक विभागाने सायन-पनवेल मार्गावर या वाहनांसाठी थांबे देण्यासाठी वाहतूक पोलिसांवर दबाव टाकल्याचे सहायक पोलीस आयुक्त कार्यालयातून ‘लोकसत्ता’ला सांगण्यात आले. या बेकायदा मागणीला वाहतूक विभागाने धुडकावून लावले आहे. एनएमएमटी प्रशासन या बेकायदा वाहतुकीमुळे नुकसान झाल्याची सातत्याने ओरड करते. मात्र प्रवाशांच्या मागणीनुसार पनवेलच्या नवीन मार्गावर बससेवा सुरू करण्यासंबंधी निर्णय घेण्यास वेळोवेळी टाळाटाळ करत असल्याने गेल्या सहा महिन्यांत ही बेकायदा वाहतूक वाढल्याचे पोलिसांनी सांगितले. पनवेलसह सिडको वसाहतीमधील रिक्षांचा मीटर पडत नाही.
कामोठेसारख्या शहरांमध्ये बससेवेवर बंदी घातली आहे. यामुळे लुक शहराचा मात्र व्यथा खेडय़ाची असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. कायदेशीर वाहतूक हा प्रश्न येथील नागरिकांसाठी जटिल बनला आहे. या सर्व परिस्थितीला एनएमएमटी, वाहतूक पोलीस, आरटीओ आणि स्थानिक पोलिसांच्या असमन्वय आणि हतबलतेमुळे ही वेळ प्रवाशांवर आली आहे. राजकीय कुरघोडीमुळे हा प्रश्न जनहिताचा असला तरीही पनवेलच्या दोनही राजकीय पक्षांनी हा प्रश्न कलहाचा बनविला आहे. राजकीय पक्षांच्या श्रेयांच्या लढाईत आणि विकासकामांच्या यादीमुळे कामोठेमधील बससेवेसाठी उभारलेले थांबे वर्षभरानंतरही सुनसान पडून आहेत. सुरू होण्याअगोदरच बंद पडलेली कामोठे बससेवा, सुरू न होऊ देण्याची प्रवृत्ती त्यानिमित्ताने कामोठेकरांनी अनुभवली आहे. या सर्व बाबी मोडून काढण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ते पोलीस प्रशासनही दंडेलशाही रोखण्यापेक्षा प्रवाशांची मागणी आणि प्रकरण आपल्याकडे येत नाही तोपर्यंत लक्ष देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
जनहितासाठी कायद्याचा दांडा उगारून येथे प्रशासन शहरांची वाहतूक चालवायला तयार नाही. सरकारच्या प्रशासनाने सब कुछ चलाता है ही भूमिका घेतल्याने येथील प्रवासी एकजुटीने रस्त्यावर उतरायला तयार नाहीत. नोकरी करायची, की हक्कांसाठी आंदोलने अशा कात्रीत सापडलेल्या चाकरमान्यांनी मोठय़ा स्फूर्तीने गुरुवारी महाराष्ट्र दिनाचा आनंद एका दिवसापुरता लुटला. सुट्टीच्या दिवसानंतर पुन्हा खाली मान करून रिक्षाचालक म्हणेल तितके भाडे द्यायला आणि शेअर रिक्षात प्रवास करताना खेटून मांडीवर बसून प्रवास करण्याची तयारी पनवेलच्या प्रवाशांनी केली आहे.

Story img Loader