आमगाव तालुक्यातील बनगाव येथे २० जुलला पाच वर्षीय आरुषी घरासमोर खेळताना अचानक बेपत्ता झाली. दरम्यान, तीन दिवसानंतरही मुलीचा शोध न लागल्याने पोलिसांनी आरुषीच्या शोधात सर्च ऑपरेशन राबवले. १३ दिवसांनंतरही जनतेचे कैवारी म्हणून मिरवणाऱ्या एकाही जनप्रतिनिधीने पीडित कुटुंबाचे साधे सांत्वन दाखवण्याचे सौजन्य दाखवले नाही. या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
बनगाव येथील आनंद सूर्यवंशी यांची पाच वर्षीय मुलगी आरुषी घरासमोर खेळत होती. मात्र, अंधार होऊनही ती घरी न परतल्याने घरच्यांनी तिचा परिसरात शोध घेतला. परंतु, ती सापडली नाही. याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या नेतृत्वाखाली राखीव दलातील जवळपास ८० जवान व पोलिसांनी गावात शोधमोहीम राबवली. यादरम्यान सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांनीही शोध मोहिमेला सहकार्य केले.  जवळपास २०० घरांची झडती व शोध घेतल्यानंतरही आरुषीचा शोध लागला नसल्याने ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा आहे. या घटनेला १३ दिवस लोटले असून ही चिमुकली कुठे आहे, ती कशी आहे, तिला कुणी नेले तर नाही ना, या प्रश्नांची उत्तरे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. मुलगी बेपत्ता झाल्यापासून पीडित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हे कुटुंब जिकडे माहिती मिळाली तिकडे धावत सुटत आहे. मात्र, साधी विचारपूस करण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधींकडे वेळ नाही, असे निदर्शनास आले आहे. शहरात विविध पक्षांची मोठमोठी राजकीय मंडळी राहतात. मात्र, कोणीही पीडित परिवाराकडे साधी सहानुभूती दाखवायला फिरकले नाहीत. जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर वगळता कोणतेही नेते तिच्या घराकडे फिरकले नाहीत. त्यातच आमगावचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी बेपत्ता झालेल्या आरुषीचा शोध घेण्यासाठी जीवाचे रान केले आहे. मुलीच्या शोधात पूर्ण पोलीस दल सोबत घेऊन प्रत्येक घर, गल्ली, मोहल्ला, जंगल, पहाड आदी परिसर िपजून काढत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी पोलिसांकडून बनगाव येथील चौकाचौकात तक्रारपेटय़ा लावून या तक्रार पेटीत आरुषीबद्दल गुप्त माहिती देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी केले आहे, तर सोमवारी बनगाव येथील श्यामराव भांडारकर यांच्या घराशेजारील विहिरीतील पाण्याचा उपसा करून आरुषीचा शोध घेतला.

Story img Loader