समाजातील वंचित आणि पीडितांचा सर्वागीण विकास शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून करावयाचा आहे. आदर्श गाव घडविण्यासाठी सर्वाची साथ मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमिक विद्यामंदिर नूतन इमारतीचे व लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रवेशव्दाराचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. सामान्यांचा विकास, तरुणांना उज्ज्वल दिशा, गरिबांना रोजगार, कुपोषण मुक्ती, सामान्य महिलांना शक्ती देण्याबरोबर गावात अर्थार्जनाचे साधन निर्माण करून आदर्श गाव घडवायची आहेत. त्यासाठी शासनाच्या विविध योजना गावापर्यंत पोहचविण्याकरिता सर्वानी सहकार्य करावे, असे आवहन मुंडे यांनी केले. महिलांना केवळ घरातच नव्हे तर, समाजातही सुरक्षा मिळणे गरजेचे आहे. मुलींचा घटणारा जन्मदर वाढविण्यासाठी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हे अभियान यशस्वीरित्या राबविण्याची आवश्यकता आहे. समाजात जनजागृती करण्याबरोबरच प्रत्येक घरात मुला-मुलींना समान दर्जा दिला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी आ. राजाभाऊ वाजे, आव्हाड यांची भाषणे झाली. हेमंत धात्रक यांनी प्रास्तविक केले. सरचिटणीस अ‍ॅड. तानाजी जायभावे यांनी आभार मानले. कार्यक्रमापूर्वी नाशिक लघुसिंचन विभागाच्या वतीने सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सिमेंट साखळी बंधाऱ्याच्या कामांची पंकजा मुंडे यांनी पाहणी केली.
तसेच वडगाव पिंगळा येथे स्थानिक विकास निधी व जनसुविधा योजनेंतर्गत सुमारे २५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या ग्रामसचिवालयाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे, खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. बाळासाहेब सानप, क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड आदी उपस्थित होते.