उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारताच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, व्हॅन तसेच अॅपे रिक्षा (तीनआसनी) चालकांनी स्वतंत्रपणे आजपासून बंद पुकारला आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी संप पुकारला तर अॅपेचालकांनी आपल्या रिक्षा आरटीओ कार्यालयात जमा करून तेथेच उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, काही टोळक्यांनी दुपारी दगडफेक करून महापालिकेच्या शहर बससेवेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीत दोन बसच्या काचा फुटल्या, तर एक महिला प्रवासी जखमी झाली.
राज्य सरकारने शालेय वाहतूक करणाऱ्यांना नियमावली लागू केली आहे. त्यासाठी प्रत्येक शाळास्तरावर समित्या स्थापन करण्याचे आदेश आहेत. आरटीओ व पोलिसांनी त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने शालेय रिक्षात चार विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात रिक्षा हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष शंकरराव घुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की वाढत्या महागाईत, पेट्रोल व डिझेलचे दर वाढलेले असताना चार विद्यार्थ्यांची वाहतूक करणे चालकांना परवडत नाही. शहरात शालेय वाहतूक करणाऱ्या सुमारे ३०० रिक्षा आहेत. किमान ६ ते ७ विद्यार्थ्यांची परवानगी मिळावी अशी मागणी आहे. संप बेमुदत सुरू ठेवायचा का, याचा निर्णय घेण्यासाठी उद्या, मंगळवारी सकाळी रिक्षाचालकांची बैठक होणार आहे, त्यासाठी काही पालकांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
सोमवारपासून संप असल्याची आगाऊ सूचना काही चालकांनी पालकांना दिली होती, त्यामुळे पालकांना पाल्यांना शाळेत नेऊन सोडण्याची व आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागली. काहींनी ती आनंदाने स्वीकारली तर काहींची गैरसोय झाली.
दरम्यान अॅपे रिक्षांना (तीनआसनी) वाहतुकीसाठी परवानेही दिले जात नाही व कारवाईही केली जाते, या आरटीओच्या भूमिकेच्या विरोधात सुमारे दीडशे अॅपेचालकांनी बंद पुकारून, आपल्या रिक्षा आरटीओ कार्यालयात जमा केल्या व चालकांनी तेथेच उपोषण सुरू केले. परवाने देऊन कायदेशीर व्यवसाय सरकारने करू द्यावा, अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र याची दखल न घेता आरटीओ कारवाई करत आहेत, त्याचा भरुदड चालकांना सहन करावा लागतो आहे. चालकांना सन्मानाने जगू द्यावे.
दरम्यान अॅपेचालकांचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व आरटीओ यांच्या एकत्रित बैठकीतूनच सुटू शकेल. अधीक्षक व आरटीओ उपस्थित नसल्याने बंद व उपोषण सुरूच राहील, असे सय्यद अफझल यांनी सांगितले. अशोक साळी, भाऊ वाकळे, नितीन जगताप, सुनील केदारे आदी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.
एएमटीचे नाहक नुकसान
रिक्षाचालकांनी संप, बंद सुरू केला तरी मनपाची एएमटीची बससेवा सुरूच होती, त्यामुळे बससेवेच्या प्रवाशांत एकदम वाढ झाली. त्यामुळे बससेवेत व्यत्यय आणण्याच्या हेतूने दुपारी लालटाकीजवळील अप्पू हत्ती चौकात व आयुर्वेद कॉलेज कॉर्नरजवळ एएमटीच्या दोन बसवर टोळक्यांनी दगडफेक केली व ते पसार झाले. दगडफेकीत दोन्ही बसच्या दर्शनी काचा फुटल्या. अप्पू हत्ती चौकातील घटनेत एक प्रवासी महिला जखमी झाल्याचे तोफखाना पोलिसांकडून समजले. यासंदर्भात पर्पल कंपनीचे व्यवस्थापक दीपक मगर यांच्याशी संपर्क साधला असता, आर्थिक अडचणीत असतानाही तोटा सहन करून नागरिकांना सुविधा दिली जात आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत बससेवेला पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली.
शहरात सार्वजनिक वाहकतुकीचे तीन तेरा
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारताच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, व्हॅन तसेच अॅपे रिक्षा (तीनआसनी) चालकांनी स्वतंत्रपणे आजपासून बंद पुकारला आहे.
First published on: 14-01-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public transport collapses in the city