महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची माहिती देणाऱ्या ‘महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित’ या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी सरव्यवस्थापक अनुराधा ठाकूर यांच्या हस्ते झाले.
दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’या संकेतस्थळाच्या तिसऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमात हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. दिनकर गांगल आणि यश वेलणकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.
या वेळी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून प्रसिद्ध मुलाखतकार-निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
वेगवेगळ्या विषयात खूप मोठे काम करणारे डॉ. राजेंद्र चव्हाण, प्रा. रवी बापट, सतीश गदिया, वीणा गोखले, दिनेश वैद्य यांच्याशी गाडगीळ यांनी संवाद साधला. कार्यक्रमाची सांगता किरण क्षीरसागर यांनी सादर केलेल्या ‘साहित्याचे अभिवाचन’ या कार्यक्रमाने  झाली.
‘बिंब-प्रतिबिंब’चा हिंदूी अनुवाद प्रकाशित
चंद्रकांत खोत लिखित ‘बिंब-प्रतिबिंब’ या कादंबरीच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन नुकतेच बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते एका कार्यक्रमात झाले. पत्रकार रमेश यादव यांनी हा अनुवाद केला           आहे.
‘भारतीय ज्ञानपीठ’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. रामजी तिवारी हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
या वेळी बोलताना डॉ. सिंह यांनी सांगितले की, इंग्रजांनी सुरू केलेल्या आपल्या येथील शिक्षण व्यवस्थेत आपले प्राचीन वाङ्मय असलेल्या वेदांना महत्व नाही. पण वेदांचा अभ्यास ही काळाची गरज असून आणखी काही काळाने लोकांना याची गरज भासणार आहे. या वेळी डॉ. तिवारी, लेखक यादव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
‘हिंदूुत्व ही आदर्श जीवनप्रणाली-राम नाईक
विश्वनाथन यांनी लिहिलेल्या ‘अ‍ॅम आय ए हिंदूू’ या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन नुकतेच माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या हस्ते झाले. बाळासाहेब माने यांनी या इंग्रजी ग्रंथाचा ‘मी हिंदूू आहे का’ या नावाने केलेला अनुवाद श्री अक्षर ग्रंथ प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे.
या वेळी बोलताना नाईक म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत जाऊन हिंदुत्व ही कल्पना जगाला समजून सांगितली. विश्वनाथन यांनी हिंदुत्वाबाबत इंग्रजीत पुस्तक लिहून तेच काम पुढे नेले आहे. हिंदूुत्व ही एक आदर्श जीवनप्रणाली आहे. डॉ. रामदास गुजराथी यांनी प्रास्ताविक केले. या वेळी राम देशमुख आणि बाळासाहेब माने यांचीही भाषणे झाली. प्रा. शशिकांत अटावळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मनोहर रणपिसे यांना  ‘गझल गौरव’ पुरस्कारप्रदान
 यूआरएल फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘गझल गौरव’ हा पुरस्कार नुकताच ज्येष्ठ गझलकार मनोहर रणपिसे यांना कराड नागरी सहकारी बँकेचे सुभाष जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख १५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 याच कार्यक्रमात रणपिसे यांच्या ‘निर्वाण’ या गझल संग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. सोमनाथ प्रकाशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
 यूआरएल फाऊंडेशनचे अध्यक्ष उदयदादा लाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ, अभिनेते उपेंद्र लिमये, रवी दाते आदी या वेळी उपस्थित होते.

Story img Loader