मराठा विद्या प्रसारक समाज संचलित येथील कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या ‘बहर’ नियतकालिकचे  प्रकाशन, संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन आणि विद्यार्थी गुणगौरव असा तिहेरी सोहळा संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले हे होते. विद्यार्थ्यांनी सुधारित तंत्रज्ञान आत्मसात करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे, असे आवाहन पवार यांनी केले. नाशिक जिल्ह्य़ाचा विचार करता द्राक्ष, डाळिंब, पेरू, कांदा या पिकांचे उत्पादन वाढविण्याची कास धरावी. विद्यार्थ्यांनी स्वत:चा व्यवसाय निवडताना शेती व्यवसायाला प्रथम प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे कार्य केल्यास त्यांना समाजाचे ऋण फेडण्याची संधी मिळेल, असेही त्या म्हणाल्या. डॉ. ढिकले यांनी शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्याची गरज व्यक्त केली. संगणक प्रयोगशळेचे उद्घाटन संस्थेचे उपसभापती नानाजी दळवी यांनी केले. २०११-१२ या शैक्षणिक वर्षांतील आदर्श विद्यार्थी म्हणून रामहरी बोरनारे यांचा गौरव करण्यात आला. प्रास्तविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव मोगल यांनी केले. आभार प्रा. दीपक पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन अंकिता भोसले व प्रा. धीरज निकम यांनी केले