छत्रपती शिवाजीमहाराज तुळजाभवानीमातेचे निस्सीम भक्त होते. शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची पायाभरणी भवानीमातेचा आशीर्वाद व प्रेरणेतूनच झाल्याची साक्ष देणारी महापूजा सातव्या माळेदिवशी तुळजाभवानी देवीसमोर मांडण्यात आली. या वेळी भाविकांनी मोठय़ा संख्येने भवानी तलवार पूजेचे दर्शन घेतले.
सातव्या माळेनिमित्त तुळजाभवानी नवरात्र महोत्सवात भाविकांच्या उत्साहाला भरती आल्याचे चित्र होते. मध्यरात्रीपासून मंडपातील दर्शनरांगा शिस्तमय पद्धतीने सुरू होत्या. ‘आई राजा उदे उदे’च्या घोषाने परिसर दुमदुमून गेला. दर्शनरांगांमध्ये सुविधांमुळे भाविकांत समाधान व्यक्त होत आहे. अभिषेक रांगातील भाविकांमध्ये सुविधांचा अभाव असल्याची ओरड होती. दर्शन मंडपाप्रमाणे अभिषेक मंडपही अत्याधुनिक करण्याची मागणी भाविकांमधून होत आहे.
पायी आलेल्या भाविकांसह दर्शन १ तास व अभिषेक २ तासांत होत असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवताना पोलीस प्रशासनाला बळाचा वापर करावा लागला नाही. अधीक्षक सचिन पाटील यांनी दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर मंदिरात तळ ठोकला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दर्शनानंतर बाहेर पडताना मातंगीआई मार्गावरील दरवाजा अधिक उपयोगात येत असून राजमाता जिजाऊ दरवाजा कायमस्वरूपी उघडण्याची मागणी होत आहे.
सातव्या माळेदिवशी सकाळी ७ वाजता अभिषेक सुरू झाले. सुमारे ५ तास दही-दुधाचे अभिषेक चालले. महंत तुकोजीबुवा व महंत चिलोजीबुवा यांनी आशीर्वाद दिले. पूजेनंतर देवीची आरती व अंगारा निघाला. शिवरायांना तुळजाभवानीमाता तलवार देत असतानाचा देखावा पुजाऱ्यांनी मांडला होता. चांदीच्या सिंहासनावर प्रतीकात्मक किल्ला दाखवून त्यासमोर गुडघा टेकून भवानीमातेकडून तलवार घेत असणारे शिवराय दाखविण्यात आले. शिवरायांच्या दोन फुट उंचीच्या चांदीच्या मूर्तीस लाल रंगाचा भरजरी फेटा बांधला होता. भवानी मातेचे दागदागिने व जांभळ्या रंगाच्या शालूला पिवळ्या हळदी रंगाचा पदर व त्यावरील अत्यंत सुबक नक्षीकाम सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.
शुक्रवारीही चांदीचे सिंह द्वारपाल म्हणून देवीसमोर मांडले होते. लाल रंगाची देवीच्या पायाखालील गादी व देवीच्या पादुका नित्याप्रमाणे मांडल्या होत्या. औरंगाबादला जाताना व विजापूरला येताना शिवराय भवानीमातेचे दर्शन घेत असत. अनेक मौल्यवान अलंकारही त्यांनी देवीला अर्पण केल्याने सामान्य भाविकांना भवानी तलवार अलंकार पुजेदिवशी शिवरायांच्या प्रगाढ इतिहासाचे स्मरण होते. सुमारे दोन लाखांवर भाविकांनी भवानी तलवार अलंकार महापुजेदिवशी तुळजाभवानीचे दर्शन घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा